@maharashtracity

रुग्णालये, कोविड केंद्रांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करा- नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुंबई: दक्षिण आफ्रिकेसह (South Africa) काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट (New variant of corona) डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील (MMR region) सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन घेण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (UDD Minister Eknath Shinde) यांनी आज दिल्या.

सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील (covid Center) आयसीयू (ICU), ऑक्सिजन (Oxygen) आणि व्हेंटिलेटर (Ventilators) उपकरणांची तपासणी करुन त्या कार्यरत करण्यासाठी सज्ज करून ठेवण्याचे निर्देशही नगरविकासमंत्र्यांनी आज दिले.

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोविड-१९ (covid-19) चा नवा घातक व्हेरियंट सापडल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सूचनेनुसार आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली.

बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी (Bhushan Gagrani), मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी उपस्थित होते.

यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या राज्यात घटते आहे, ही समाधानाची बाब असली तरी यामुळे यंत्रणा जरा निर्धास्त झालेल्या दिसतात. सामान्य नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून आता आपल्याला गाफिल राहून चालणार नाही.

कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांची रुग्णालये सज्ज ठेवा, सर्व रुग्णालयांच्या इमारतींचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट तातडीने करुन घेण्याच्या सूचनाही यावेळी शिंदे यांनी दिल्या.

सुदैवाने सध्या रुग्ण नसल्याने बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यंत्रणा बंद आहेत, रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष, ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर यंत्रे यांची तपासणी करुन ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

सामान्य नागरिकांकडून मास्क (mask) वापरण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले असून अनावश्यक गर्दीवर देखील नियंत्रण आणण्याची गरज आहे.

शारीरिक अंतराची मर्यादा, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या दृष्टीने सर्व महानगरपालिका, नगरपालिकांनी जनजागृती करण्याच्या सूचना देऊन प्रसंगी क्लिन अप मार्शल सारखे उपक्रम राबवून महापालिका, नगरपालिका स्तरावर मास्कची सक्ती करण्याचे निर्देशही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुंबई महानगरपालिकेने विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करुन मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये जे प्रवासी विदेशातून आले आहेत, त्यांची यादी सर्व महानगरपालिकांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना नगरविकासमंत्री शिंदे यांनी दिल्या.

कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट सापडलेल्या १० देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहिती सर्व महानगरपालिकांनी सहायक आयुक्तांच्या माध्यमातून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

अति जोखमीच्या देशातून गेल्या १४ दिवसांतून आलेल्या प्रवाशांची देखील यादी विमानतळाकडून घेण्याच्याही सूचना शिंदे यांनी यावेळी दिल्या. सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या प्रमुखांनी आपल्या अखत्यारितील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन दक्ष राहण्याच्या सूचना द्या. सर्व यंत्रणांची तपासणी करुन घेण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात येणार असून त्यांचे कोणत्याही परिस्थितीत गृह अलगीकरण करण्यात येणार नाही. काकाणी म्हणाले, दुर्दैवाने असा रुग्ण आढळून आल्यास त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रांमध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येईल.

घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीत आढळला तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार असल्याचेही काकाणी यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर (RTPCR) दर दिवसाआड करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here