@maharashtracity

मुंबई: आयुर्वेदिक, अध्यात्मिकदृष्ट्या बहुगुणी असलेल्या ‘तुळशी’ च्या ५२ हजार रोपांची विक्री पालिका उद्यान विभागाच्या रोपवाटिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याबाबतची माहिती, पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

धार्मिक, अध्यात्मिक, आयुर्वेदिकदृष्ट्या महत्व असलेली व बहुपयोगी आणि बहुगुणी ‘तुळस’ (Tulasi) ही वनस्पती ‘क्वीन ऑफ हर्ब्स’ अर्थात औषधांची राणी म्हणून ओळखली जाते.

महापालिकेच्या उद्यान विभागाच्या सर्व रोपवाटिकांमधून मिळून सन २०२०-२१ या कालावधीत तुळशीच्या ५२ हजार रोपांची विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेला काही मर्यादित स्वरूपात उत्पन्न मिळाले आहे.

मात्र, कोविड (covid) संसर्ग कालावधीत काही सामाजिक उपक्रमांसाठी तुळशीच्या रोपांचे विनामूल्य वितरणदेखील प्रशासनाकडून करण्यात आले होते.

तुळस वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘ऑसिमम संक्टम’, (ocimum sanctum) असे आहे. पुदिनाच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती म्हणून ती ओळखली जाते. आशिया (Asia), युरोप (Europe) व आफ्रिका (Africa) या खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशात तुळशीची झुडुपे आढळतात. तुळशीची रोपे सुमारे ३० ते १२० सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढतात. बहुगुणी फायद्यामुळे आयुर्वेदामध्ये (Ayurveda) या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे.

तुळशीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. रक्तशुद्धीकरण, प्राणवायू पुरवठा, दुर्धर आजारांमध्ये मदतकारी व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास तुळशीची मदत होते, असे मानले जाते. यामुळेच भारतीय संस्कृतीत तुळशीला पवित्र व पूजनीय मानले जाते.

तुळशी रोपाला असलेली मोठी मागणी विचारात घेता पालिकेच्या उद्यान विभागाच्या अखत्यारितील सर्व विभागीय रोपवाटिकांमध्ये आणि राणी बागेतील रोपवाटिकेमध्ये त्याची लागवड करण्यात येते. संपूर्ण वर्षभर नाममात्र १ रुपये दराने ही रोपे विक्रीसाठी उपलब्ध असतात.

काही सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, सर्वसामान्य नागरिक तुळशीची रोपे मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. कार्तिकी शुद्ध एकादशी ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत चालणारा तुलसी विवाह कालावधी, यासह विविध सण-उत्सवात तुळशीच्या रोपांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते.

यंदादेखील १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरु झालेल्या तुलसी विवाह विधी कालावधीत तुळशीच्या रोपांना वाढती मागणी आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here