@maharashtracity

पालिका शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना ३९ कोटींचे टॅब

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (corona pandemic) बघता पुन्हा एकदा ऑनलाइन शाळा (online school) सुरू करण्याची वेळ येऊ शकते. हे लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने (BMC) पालिकेच्या शाळेत दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 19 हजार 959 टॅब (Tab) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका तब्बल 38 कोटी 72 लाख रुपये मोजणार आहे. याचा अर्थ एका टॅबची किंमत 19 हजार 959 रुपये याप्रमाणे रक्कम मोजणार आहे.

बाजारात सरासरी 4 ते 5 हजार रुपयांत मिळणाऱ्या टॅबसाठी पालिका जवळपास 20 हजार रुपये मोजणार असल्याने पालिकेतील विरोधी पक्ष भाजप (BJP) या प्रस्तावाला विरोध करेल अशी शक्यता आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकित मंजुरीसाठी येणार आहे. या प्रस्तावावर आक्षेप घेऊन पालिकेतील पहारेकरी भाजपकडून सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) व पालिका प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती करीत घेरण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मुंबईतील कोविड संसर्गावर अलिकडेच नियंत्रण मिळविल्यानंतर पालिकेने इयत्ता ८ वी ते १० वीच्या शाळा उघडल्या. त्यानंतर इयत्ता १ ली ते ७ वीच्या शाळा सुद्धा नुकत्याच उघडण्यात आल्या.

मात्र काही मुंबईकरांच्या (Mumbaikar) बेफिकिरीपणामुळे आता मुंबईत पुन्हा एकदा कोविड सोबत नवीन प्रकार असलेल्या ‘ओमायक्रॉन’ चे रुग्ण (Omicron patients) पटापट आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबईत कोविडची तिसरी लाट (third wave of covid) येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दिल्लीमध्ये (Delhi) कोविड रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने प्रशासनाने तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतही कोविडचा संसर्ग वाढत असल्याने पुन्हा एकदा शाळा बंद कराव्या लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here