@maharashtracity

सध्या कर्मचाऱ्यांसाठी पालिका मुख्यालयासह २४ प्रभागात दवाखाने

सध्या रात्री ११ पर्यंत सेवा देणारे १५ खासगी सहभागातून दवाखाने कार्यरत

रात्री ११ पर्यंत आरोग्यसेवेसाठी १३ आणखीन नवीन दवाखाने प्रस्तावित

मुंबई: मुंबईत सर्वसामान्य नागरीकांना विविध आजारांवर नजीकच्या दवाखान्यात सायंकाळी ४ ते रात्री ११ या कालावधीत औषधोपचार घेणे शक्य व्हावे, यासाठी पालिका आणखीन १३ ठिकाणी नव्याने दवाखाने सुरू करणार आहे. यासंदर्भातील माहिती पालिका आयुक्त यांनी लिखित स्वरूपात दिली आहे.

सध्या शहर व उपनगरे भागात १५ ठिकाणी बाह्यस्रोताद्वारे सायंकाळी ४ ते रात्री ११ या कालावधीत दवाखाने सुरू आहेत. त्याचा संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या सामान्य नागरिकांना, नोकरदारांना लाभ होत आहे. मात्र दवाखान्यांची संख्या अपुरी पडत आहे.

त्याचप्रमाणे, मुंबई शहर व उपनगरे परीसरातील २४ प्रभागात (यामध्ये पालिका मुख्यालयासह ५ वार्ड कार्यालयांतील दवाखान्यांचा समावेश आहे.) सामान्य जनतेसह पालिका, सरकारी कर्मचारी यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी दवाखाने सुरू आहेत. या २४ दवाखान्यात सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीत विविध आजारांवर औषधोपचार करण्यात येतात.

सकाळी कामावर जाणारे नागरिक संध्याकाळी उशिराने कामावरून घरी परतत असल्याने त्यांना या वेळेत या दवाखान्यात औषधोपचार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना या वाढत्या महागाईच्या काळात खासगी व महागड्या दवाखान्यात, नर्सिंग होम, खासगी रुग्णालये आदी ठिकाणी नाईलाजाने औषधोपचार घ्यावे लागतात.

यास्तव, पालिकेने सायंकाळी ४ ते रात्री ११ या कालावधीत नागरिकांना औषधोपचार घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेने वेळ वाढवावी, अशी मागणी काही नगरसेवकांकडून पालिका आयुक्त यांच्याकडे वारंवार करण्यात येत होती.

नगरसेविका प्रियांका सावंत (Priyanka Sawant) यांनी वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सर्वसामान्य जनतेला अधिक चांगली आरोग्य सुविधा देण्यासाठी वार्ड निहाय २२७ ठिकाणी पालिकेने दवाखाने सुरू करावेत, अशी मागणी पालिका आयुक्त यांच्याकडे केली होती.

मात्र पालिकेने त्यास अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. पालिका केईएम, नायर, सायन, कूपर आदी प्रमुख रुग्णालये, १६ सर्वसाधारण रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये, २८ प्रसूतिगृहे, २११ आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी २४ तास आरोग्य सुविधा देण्यात येत असल्याचे कारण दिले आहे.

तसेच, २४ प्रभागात २४ दवाखाने, बाह्यस्रोताद्वारे १५ दवाखाने या ठिकाणी सायंकाळी ४ ते रात्री ११ या कालावधित नागरिकांना आरोग्य सुविधा दिल्या जात असल्याची कारणे पालिकेने दिली आहेत. मात्र नगरसेविका प्रियांका सावंत यांच्या मागणीची काहीशी गंभीर दखल घेऊन पालिकेने, आणखीन १३ ठिकाणी नव्याने दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्या ठिकाणी सायंकाळी ४ ते रात्री ११ या कालावधीत औषधोपचार देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

त्यामुळे मुंबईकरांना विशेषतः गरीब, गरजू नागरिकांना या नवीन दवाखान्यांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

  प्रस्तावित १३  नवीन दवाखाने 

  वार्ड                           ठिकाण 

  बी                         एस.व्ही.पी.रोड

  डी                      आर.आर. मार्ग

 एफ/दक्षिण            नायगाव प्रसूतिगृहे 

 एफ/दक्षिण            शिवडी

  के/ पूर्व                 नटवरनगर

 आर/उत्तर               शास्त्रीनगर

  आर / उत्तर             गोराईगाव

    एल                      बैलबाजार 

     एल                     चांदीवली

     एल                   मोहिली व्हिलेज

      एन              पंतनगर, घाटकोपर

       एन              नाथ पै मार्ग

      एन               साईनाथ नगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here