@maharashtracity
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, रिगल सिनेमासमोरील वाहतूक बेटाच्या जागेत जानेवारी २०२१ मध्ये उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Statue of Balasaheb Thackeray) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
यासंदर्भातील टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर कामाच्या प्रस्तावाला पालिकेची अंतिम मंजुरी मिळताच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका ‘ए’ वॉर्डातील साहाय्यक अभियंता जितेंद्र देवळेकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
पुतळ्याबाबतची अधिक माहिती
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी दुःखद निधन झाले होते. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना करून व भाजपशी युती करून महाराष्ट्रात युतीची सत्ता आणली व शिवसेनेचा मुख्यमंत्री केला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने केंद्रातही शिवसेना व भाजप यांच्या युतीची दोन वेळा सत्ता आली व त्यात सेनेला केंद्रीय मंत्रिपद मिळाले. बाळासाहेब यांच्या आशीर्वादानेच राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना लोकसभा अध्यक्षपद देण्यात आले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात एक चांगलाच दरारा होता. त्यांचे व त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण निरंतर होण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, रिगल सिनेमा समोरील वाहतूक बेटाच्या जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९ फुट उंचीचा आकर्षक पूर्णाकृती पुतळा २ गवताचा मंच व ११ फुटी पोडीएमवर जानेवारी २०२१ मध्ये उभारण्यात आला.
या पुतळ्याचे अनावरण बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजे २३ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार, मनसेचे नेते राज ठाकरे, केंद्रिय मंत्री रामदास आठवले, महापौर किशोरी पेडणेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षमेटे प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते.
३ महिन्यात सुशोभीकरण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २३ जानेवारी २०२१ रोजी म्हणजे बाळासाहेब यांच्या जयंतीदिनी करण्यात आले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा, परिसरात छान व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. फुलांनी सजविण्यात आले होते.
मात्र आता अवघ्या १० महिन्यात पुतळ्याखालील भागातील चबुतऱ्याचा काही भाग पांढराफिका पडला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करणे, सुशोभीकरण करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.
त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. टेंडरला चांगला प्रतिसाद लाभल्यास व प्रस्तावाला पालिकेची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील ३ महिन्यात सदर काम पूर्ण करण्यात येणार आहे.
या कामांसाठी प्राथमिक अंदाजानुसार किमान १६ लाख रुपये खर्च होणार असल्याचे समजते. मात्र जर कामांत आणखीन काही मोठा बदल झाल्यास हा खर्च आणखीन काही लाखांनी वाढण्याची शक्यता आहे.