@maharashtracity

२५ ते ८ सप्टेंबर राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा विशेष

मुंबई: मरावे परी नेत्ररुपी उरावे असे नेत्र दानाच्या (eye donation) प्रोत्साहनासाठी बोलले जात असले तरीही कोरोना काळात नेत्रदानाचे प्रमाण घटल्याचे समोर येत आहे.

कोरोना महामारीपूर्वी (corona pandemic) चार महिन्यात किमान ३०० नेत्रदान होत असत. मात्र, कोरोना काळात नेत्रदान घटले असून नेत्रदान जागरूकता पुन्हा जोमाने करण्याची गरज असल्याचे मुंबईच्या ज्येष्ठ व्हिट्रीओरेटीनल सर्जन प्रा.डॉ. सरोज सहदेव यांनी सांगितले.

प्रा. डॉ. सरोज सहदेव या पालिकेच्या नायर रुग्णालयाच्या (Nair Hospital) माजी नेत्र विकार विभागा प्रमुख होत्या.

दरम्यान, कोरोना महामारीच्या पूर्वी मुंबईतील नेत्रपेढ्यांमध्ये ९०० हून अधिक नेत्रदान करण्यात आले होते. तसेच दरवर्षी ४० हजार नेत्रदानाची गरज असून २० हजार नेत्रदान होते. याचाच अर्थ ५० टक्के दृष्टीविन आयुष्य जगत असतात.

गेल्या वर्षभरात घट झाली असली तरी आता नेत्र दान करण्यास सुरुवात झाली असल्याचे डॉ. सहदेव म्हणाल्या. कोविड झालेल्या व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह झाल्याच्या ४५ दिवसानंतरच नेत्रदान केले जाऊ शकते. नेत्रदानाची प्रक्रिया करताना त्या व्यक्तीच्या कोविड चाचणीसाठी स्वाब घेतला जातो. ती चाचणी निगेटिव्ह आली तरच डोळे काढले जातात.

मृत्यूनंतर जवळपास ४ ते ६ तासांत कॉर्निया दान केला जातो. अन्यथा कॉर्निया खराब होण्याची शक्यता असल्याचे त्या म्हणाल्या. सध्याच्या कोरोनामुळे डोळ्यातूनही संसर्ग पसरु शकतो. त्यामुळे तज्ज्ञांनी नेत्रदान आणि नेत्रप्रत्यारोपण करण्यास खीळ बसली.

आता नेत्रदान करण्यास पुढेच येण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ करत आहेत. पुन्हा एकदा हळूहळू ही मोहिम सुरू केली जात असल्याचे प्रा.डॉ. सरोज सहदेव यांनी सांगितले.

भारतात २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान दरवर्षी राष्ट्रीय नेत्रदान पंधरावडा साजरा केला जातो. यावेळी नेत्रदानाचे महत्त्व सांगणे आवश्यक आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन ते चार जणांना दृष्टीत मिळू शकते. नेत्रदान केलेल्या दात्यांच्या डोळ्यांच्या केवळ बुबुळांचे प्रत्यारोपण केले जाते. पूर्ण नेत्रगोलाचे होत नाही म्हणून त्याला नेत्ररोपण न म्हणता ‘बुबुळ रोपण’ असेही म्हटले जाते. देशात ४०२ नोंदणीकृत नेत्रपेढ्या असून १२० नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. यातील ५६ नेत्रपेढ्या महाराष्ट्रात आहेत. भारतात दरवर्षी एक कोटीच्या जवळपास मृत्यु होत असून त्यापैकी फक्त १.५ टक्के लोक नेत्रदान करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here