१ डिसेंबर जागतिक एड्स दिन विशेष

Twitter @maharashtracity

By डॉ दीपक मुंढे

एड्सबाधित झाल्यास अनेक उपचार आणि जीवनमान वाढवणारे अनेक औषधे आहेत. सरकारी एआरटी केंद्रातून एचआयव्ही बाधितांवर उपचार केले जातात. मात्र बाधित असल्याचे कळल्यावर रुग्णाची तसेच कुटुंबियांची अजूनही गाळण उडतेच. त्यासाठी समुपदेशन महत्वाचे आहे. नेमकं हेच सांगणारा अनुभव धारावीतील पालिकेच्या छोट्या सायन रुग्णालयातील डॉ. दीपक मुंढे यांनी सांगितलेली अनुभूती. त्यांच्याच शब्दांत…..

राकेश (नाव बदलले आहे) सव्वीस वर्षाच्या तरुणाला त्याचे आई-वडील माझ्या क्लिनिकमध्ये दोन महिन्यापूर्वी घेऊन आले, नेहमी ताप व वजन कमी होत असल्याने मुंबईतील एका मोठ्या खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती होता. तिथेच त्याला एचआयव्हीचे (HIV) निदान झाले. परंतु सुट्टीनंतरही ताप व अशक्तपणा जात नसल्याने जवळील डॉक्टर म्हणून माझ्यापर्यंत आलेत. सर्व फाईल रिपोर्ट पाहिल्यानंतर मी अधिक माहिती विचारली, निदान झाले होते. परंतु त्यांना एचआयव्ही बाबत विशेष काही माहिती रुग्णालयाने दिली नव्हती. वास्तविक पाहता एचआयव्ही तपासणीमध्ये समुपदेशनाचा भाग सर्वाधिक महत्त्वाचा आहे. घरी इंटरनेटवर माहिती वाचून परिवाराची घाबरगुंडी उडालीच, सोबत राकेशकडे पाण्याचा दृष्टिकोनसुद्धा हिणकस झालेला मला जाणवला, त्यात डोळ्याला डोळा मिळवून बोलण्यास हिचकणारा राकेश मात्र मनातून खचलेला व नैराश्याच्या गर्तेत गेलेला दिसला.

एचआयव्ही बद्दल इत्यंभूत माहिती, परिवार व रुग्णाचे विस्तृत समुपदेशन केल्यानंतर अपॉर्च्युनिस्टिक/संधीसाधू संक्रमण टीबीचे (Infectious TB) निदान होऊन उपचार सुरू केले. त्यात डॉ. अजित हांगे यांची विशेष मदत झाली. हळूहळू का होईना परंतु राकेशची तब्येत सुधारते आहे. एमडी करत असताना मालवणी आरोग्य केंद्रातील एआरटी केंद्रात शेकडो एचआयव्ही रुग्णांना तपासण्याचा अनुभव आला, त्यातील बहुतांश सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत, सीडी नॉर्मल आहे व वायरल लोड नसल्यागत आहे. असे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी देणारे एआरटी केंद्र जवळपास सर्वच शासकीय रुग्णालयात सहज उपलब्ध आहेत. डॉक्टर, मनोचिकित्सक व तंत्रज्ञ यांची कुशल टीम एचआयव्ही तपासणी ते उपचारांच्या सेवा पुरवतातच सोबतच रुग्णाच्या गोपनीयतेची विशेष काळजी घेतली जाते. तिथून मोफत उपलब्ध असलेले एआरटीचे औषध (दिवसाला केवळ एक गोळी), पोषक आहार, व्यसनापासून अलिप्तपणा या गोष्टींचे काटेकोरपणे पालन केल्यास आता एचआयव्ही रुग्ण सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो, सोबतच या रुग्णालयामध्ये सीडी संख्या, वायरल लोड/विषाणू संख्या, संधीसाधू संक्रमण/ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन ची नियमित तपासणी सेवा या एआरटी व एआरटी लिंक सेंटरवर मोफत उपलब्ध आहेत.

मुंबईतील झोपडपट्टी भागामध्ये राहणाऱ्या तृतीयपंथी समूहातील लैंगिक आजाराकरिता असलेल्या उच्च जोखमीचे वर्तन यावर माझा प्रबंध होता, त्यातील सुमारे ९५ टक्केहून अधिक सहभाग्यांना एचआयव्ही व लैंगिक आजारांचे लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय व आयसीटीसी/एआरटी केंद्र याबद्दल माहिती होती, ९२ टक्के हून अधिक सहभागींनी गेल्या तीन महिन्यांमध्ये एच आय व्ही तपासणी केली होती, ८५ टक्केहून अधिक सहभागी नियमित निरोध वापरास प्राधान्य देत असल्याचे आढळले. हा सकारात्मक बदल या समूहासोबत राहून त्यांच्या जवळपास सर्वच प्रश्नांवर आत्मीयतेने काम करणाऱ्या श्रीगौरी सावंत यांच्या सखी चार चौघी, हमसफर ट्रस्ट, त्रिवेणी इत्यादी सामाजिक संस्था व मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमुळे शक्य झाले आहे.

भारतात सुमारे २४ लाख लोक, त्यापैकी महाराष्ट्रात ४ लाख लोक एचआयव्हीग्रस्त आहेत, एचआयव्ही असूनही चाचणी न केलेल्या लोकांची यात नोंद नाही. एड्समुळे दरवर्षी सुमारे ४० हजार रुग्णांचा मृत्यू होतो. प्रभावी एआरटी, शिक्षण, माहिती, संवादाच्या प्रयत्नांमुळे नविन रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. परंतु इंटरनेट, शहरीकरण, लवकर वयात येण्याचे वाढते प्रमाण यामुळे ही संख्या वाढण्याची शक्यता आहेच. इतर आजारांप्रमाणे एचआयव्हीचे रोखताम करण्यासाठी लसीकरणाची आत्यंतिक गरज आहे. परंतु गेल्या वर्षात दोन मोठ्या क्लिनिकल ट्रायल अयशस्वी ठरल्या आहेत, अमेरिका व दक्षिण आफ्रिकेत अजून दोन चाचण्या सुरू आहेत. परंतु एचआयव्ही विषाणूचे स्वरूप बघता नजीकच्या भविष्यात प्रभावी लस उपलब्ध होण्याची शक्यता धुसर आहे.

भारतासह जगभरातील सर्वच देशांच्या वचनबद्धेतून संयुक्त राष्ट्रसंघाच्या (WHO) शाश्वत विकास (Sustainable Development) उद्दीष्टांत २०३० पर्यंत एड्स नियंत्रणात आणण्याचे महत्वाकांक्षी ध्येय आहे, ते साध्य करण्यासाठी शरीर विक्रय करणारे व्यक्ती, समलैंगिक, तृतीयपंथी, नवयुवक/नवयुवती या उच्च जोखीम गटासह सर्वसामान्यांना लैंगिक शिक्षण, सरसकट निरोध उपलब्धता व बरोबर पद्धत, नियमित एचआयव्ही तपासणी, समुदाय आधारित संस्थांना सरकारी-गैरसरकारी-सामाजिक सढळ मदत व त्यांचे मजबुतीकरण, पारलिंगी समूहाच्या मानवी अधिकारांचे जतन, या लैंगिक आजारांकरिता विशेषतः एचआयव्ही प्रति असलेल्या सामाजिक दुजाभावाचे खच्चीकरणासोबतच हल्ली महाग असलेल्या प्री एक्सपोजर आणि पोस्ट एक्सपोजर औषधीबद्दल जनजागृती व ते स्वस्त दरात सहज उपलब्धतेसह नवीन युगाच्या सोशल मीडियाचा वापर केला, तरच हे महत्वाकांक्षी ध्येय साधले जाईल, अन्यथा हिमनगाचे टोक असलेल्या या आजाराचे तळ पाहण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

(लेखक डॉ दीपक मुंढे सायन रुग्णालयात डॉक्टर आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here