@maharashtracity

प्रथमच २० हजार रुपयांचा एकसमान बोनस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

भाऊबीज भेट रु ५,५०० रुपये

माध्यमिक शिक्षक -: १० हजार रुपये

अनुदानित, विनानुदानित शाळांमधील कर्मचारी १० हजार रुपये

कॉलेजमधील शिक्षक १० हजार रुपये

शिक्षक सेवक – २,८०० रुपये

पार्ट टाइम शिक्षक सेवक – २८०० रुपये

मुंबई: मुंबई महापालिका व बेस्टच्या हजारो कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी म्हणजे चांदीच चांदी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, पालिका व बेस्ट कर्मचारी यांना २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे.

तसेच, आरोग्य सेविकांना (भाऊबीज भेट) ५ हजार ५०० रुपये, माध्यमिक शिक्षकांना १० हजार रुपये, अनुदानित, विनानुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये, कॉलेजमधील शिक्षकांना १० हजार रुपये तर शिक्षक सेवकांना २ हजार ८०० रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे,

मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये तर बेस्ट कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये इतका बोनस देण्यात आला होता.

मुंबई महापालिकेच्या ९५ हजारापेक्षाही जास्त व बेस्ट उपक्रमाच्या ३६ हजार कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ होणार आहे. तर पालिकेच्या तिजोरीवर काही कोटींचा आर्थिक भार पडणार आहे.

पालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे २० हजार रूपये बोनस पुढील ३ वर्षे मिळणार आहे. त्यामुळे कामगार नेते व कामगार,कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

याप्रसंगी, मुख्यमंत्र्यांसोबत उद्योग मंत्री सुभाष देसाई, महापौर किशोरीताई पेडणेकर, उपमहापौर अँड सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, पालिका आयुक्त इकबालसिंग चहल, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, कामगार समन्वय समितीचे सदस्य बाबा कदम, अँड प्रकाश देवदास, सत्यवान जावकर, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आदी उपस्थित होते.

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मात्र ज्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता त्यावेळी हा प्रादुर्भाव कमी करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका आरोग्य कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात अथक परिश्रम घेतले.

त्याचप्रमाणे पालिकेच्या इतर खात्याच्या कर्मचार्यांनी आणि बेस्ट कर्मचारी, अधिकारी आदींनीही अथक मेहनत घेतली. कदाचित त्या कर्तव्याची दखल घेऊन आणि त्या मेहनतीची पोचपावती म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदा २० हजार रुपये बोनस जाहीर केला.

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक तोंडावर आली असताना मुख्यमंत्र्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची खुशखबर दिल्याने आता त्याचा लाभ निवडणुकीत होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा पालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here