पुढील आठवड्यात राज्यस्तरावर निर्णय होण्याची शक्यता

@maharashtracity

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊन कोरोना काहीसा नियंत्रणात आलेला आहे. हे जरी खरे असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे थांबलेला नाही. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. मात्र ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले असतील, अशा लोकांना सध्या सुरू असलेल्या निर्बंधांमधून काही सवलत देण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे. मात्र त्याबाबत राज्य स्तरावर १५ जुलैपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली.

मुंबईत सध्या कोरोना (coronavirus) रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर दुसरीकडे पालिकेकडून लसीकरण प्रक्रिया सुरू आहे. ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस अथवा दोन्ही डोस घेतले असतील अशा नागरिकांना निर्बंधात काहीशी सवलत देण्याचा विचार आहे. मात्र याबाबतचा निर्णय शासनच घेईल, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मात्र लसीचे एक अथवा दोन डोस घेणाऱ्यांना रेल्वे प्रवास करण्यास एवढ्यात मुभा देता येणार नाही. लसीचे एक व दोन डोस घेणाऱ्या व कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

तसेच, जर एखाद्या कंपनीने स्वखर्चाने अथवा पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीचे दोन डोस घेतल्यास त्या कंपनीलाही निर्बंधात काहीशी सूट देण्यात येणार आहे, असे काकाणी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here