@maharashtracity

आगीच्या घटनेवरून महाविकास आघाडी भाजप यांच्यातील राजकारण तापणार

मुंबई: मेट्रो कारशेडसाठी नियोजित केलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या जागेत गवताला सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत किमान १ हजार × १ हजार चौ. फूट जागेतील गवत जळून खाक झाले.

ही आग लागली की लावली, याबाबतची सत्य माहिती चौकशीतून समोर येणार आहे. मात्र, या आगीच्या घटनेवरून महाविकास आघाडी (MVA) व भाजप (BJP) यांच्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईतील विविध मेट्रो रेल्वे मार्गावर लवकरच मेट्रो रेल्वे धावणार आहे. या मेट्रो रेल्वे गाड्या पार्किंग करण्यासाठी भाजपप्रणित सरकारने त्यावेळी आरे कॉलनीतील (Aarey Colony) जागा नक्की केली होती. मात्र, या जागेतील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार असल्याचा मुद्दा उपस्थित करीत शिवसेनेने (Shiv Sena) आरेमधील जागेला विरोध केला होता. मात्र भाजपने त्यास दाद दिली नव्हती.

नंतर विधानसभा निवडणुकीत (Assembly polls) सत्ता परिवर्तन झाले. शिवसेना व भाजप यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याने शिवसेनेने काँग्रेस (congress) व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यासोबत घरोबा केला. तसेच, शिवसेनेने कांजूरमार्ग येथील (Kanjurmarg) भूखंडाला मेट्रो कारशेडसाठी (Metro car shed) वापरण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने सरकारने पावले उचलली. मात्र प्रकरण कोर्टात गेल्याने अधांतरी राहिले होते.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या जागेतील गवताला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल (fire brigade), स्थानिक पोलीस व पालिका वार्ड कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ४ फायर इंजिन, वॉटर टँकर यांच्या साहाय्याने आगीवर सायंकाळी उशिराने नियंत्रण मिळविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here