@maharashtracity

शहरापेक्षाही उपनगरात दुप्पट पाऊस

मुंबई: सध्या मुंबईत कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव आहे. त्यातच दहीहंडी उत्सवाचा (Dahi Handi festival) जोश आणि मंगळवारी सकाळपासून मुसळधार पावसाची (heavy rain) बरसात झाल्याने गोविंदा, मुंबईकर हे काहीसे सुखावले आहेत. गल्लीतील गोविंदांनी पावसात चिंब भिजून दहीहंडी उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.

मात्र, सकाळी ८ ते दुपारी १२ या कालावधीत शहर भागात २०.८२ मिमी पाऊस पडला तर पूर्व उपनगरात ४०.२६ मिमी आणि पश्चिम उपनगरात ३९.५२ मिमी इतका म्हणजे शहर भागातील पावसापेक्षा उपनगरात दुप्पट पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

त्याचप्रमाणे, सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत शहर भागातील भायखळा येथे ४८ मिमी, दादर – ४७ मिमी, रावळी कॅम्प – वडाळा – ४४ मिमी, पश्चिम उपनगरे भागातील गोरेगाव येथे -७६ मिमी, कांदिवली -६० मिमी, विलेपार्ले – ६१ मिमी, दहिसर – ५९ मिमी, वर्सोवा – अंधेरी – ५५ मिमी आणि पूर्व उपनगरे भागातील विक्रोळी येथे सर्वाधिक ९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तसेच, चेंबूर येथे ८५ मिमी, गोवंडी -मानखुर्द – ७० मिमी, कुर्ला – ६५ मिमी व भांडुप – ६० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.

सुदैवाने आज सकाळी ६.०२ वाजेच्या सुमारास समुद्राला छोटी भरती होती व त्यावेळी समुद्रात ३.१२ मिटर उंचीच्या लाटा उसळल्या. अन्यथा जोरदार पावसात समुद्राला मोठी भरती येऊन ४.५० मिटर उंचीच्या लाटा उसळल्या असत्या तर शहर व उपनगरात सकल भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले असते. त्याचा मुंबईच्या रस्ते, रेल्वे वाहतुकीवर म्हणजेच जनजीवनावर विपरीत परिणाम झाला असता.

दरम्यान, आगामी २४ तासात मुंबई शहर व उपनगरे भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here