@maharashtracity

कोरोनाची तिसरी लाट रोखण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ होत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार गणेशोत्सवात गर्दी वाढू नये यासाठी मी स्वतः कोणत्याही मंडळात, कोणाच्या घरी गणेश दर्शनासाठी जाणार नाही, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

त्याचप्रमाणे, नागरिकांनीही गणेशोत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी “माझं घर, माझा बाप्पा” आणि “माझं मंडळ, माझा बाप्पा” ही संकल्पना राबवावी, असे आवाहन महापौरांनी समस्त मुंबईकरांना केले आहे.

मुख्यमंत्री यांच्या आवाहनावर अंमलबजावणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, गणेशोत्सवाच्या निमित्ताने गर्दी टाळण्याचे आवाहन नागरिकांना व गणेश भक्तांना केले आहे. मुंबईत गणेशोत्सव हा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. सर्वच जाती, धर्माचे लोक या गणेशोत्वात सहभागी होत असतात.

मात्र गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाची पहिली लाट यशस्वीरीत्या परतविण्यात आली असून दुसरी लाट नियंत्रणात आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळे आता गणेशोत्सवात गर्दी वाढू नये यासाठी मुंबईची प्रथम नागरिक म्हणून , महापौर म्हणून मी स्वतः कोणत्याही गणेश मंडळात अथवा कोणाच्याही घरी गणेश दर्शनासाठी जाणार नाही. त्याचप्रमाणे नागरिकांनीही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळात व कोणाच्या घरी जाऊन गर्दी करू नये. ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, असे कृत्य करू नये.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही आपल्या कार्यकर्त्यांना मंडपात गर्दी होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर पेडणेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here