@maharashtracity

मुंबईतील पालिका, अनुदानित, विना अनुदानित ५० आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान

मुंबई: मुंबईतील विविध माध्यमाच्या पालिका, अनुदानित, विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५० आदर्श शिक्षकांना भायखळा राणी बागेतील पेंग्विन सभागृहात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते मंगळवारी पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.

यावेळी, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दहा हजार रूपये ईसीएसद्वारे, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन महापौरांच्या हस्ते‍ गौरविण्यात आले.

पालिकेच्या शाळांची वाढणारी संख्या व शिक्षकांची गुणवत्ता लक्षात घेता पुरस्कार प्राप्त शिक्षकांची संख्या ५० वरून ७५ करण्यात यावी व त्यासाठी पुरस्कारांच्या संख्येत वाढ करावी आणि पुरस्कारात देण्यात येणारी रोख १० हजारावरून २५ हजार रुपये करण्यात यावी, अशी सूचना महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेतर्फे दरवर्षी महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर महापौर घोषित करतात. मात्र गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे काही अडचणी येत असतात.

सन २०२०- २१ चे “आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार ” ५० आदर्श शिक्षकांना जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण महापौरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी, उप महापौर अँड.सुहास वाडकर, शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी, बाजार व उद्यान समिती अध्यक्षा प्रतिमा खोपडे, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, शिक्षण समिती सदस्य अल्नास झकेरिया, साईनाथ दुर्गे, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य निखील जाधव, संचालक (प्राणीसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, शिक्षणाधिकारी राजू तडवी इतर अधिकारी वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.

शिकण्याची प्रक्रि‍या ही जीवनाच्या अंतापर्यंत सतत सुरु राहणारी प्रक्रिया असते. मुंबई महापालिका गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासोबतच विद्यार्थी भविष्यकाळात ज्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय करतील त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामातून आपली ओळख निर्माण करावी, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हटले आहे.

तसेच, महापौर आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आवश्यक पात्रतेच्या निकषात बदल करून शिक्षकांचा सेवानिवृत्त होण्यापूर्वीचा कालावधी दोन वर्ष ऐवजी सहा महिने सेवा शिल्लक असा सुधारित करण्यात यावा, असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.

पुरस्कारांमुळे शिक्षकांच्या जबाबदारीमध्ये आणखी वाढ झाली असून प्रत्येक शिक्षकांनी आपल्या सेवा काळामध्ये एक तरी आय.ए. एस.विद्यार्थी घडवावा, अशी सूचना शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी
यांनी यावेळी केली.

सह आयुक्त (शिक्षण ) 1अजित कुंभार यांनी, शिक्षकांना मिळालेला पुरस्कार म्हणजे चांगल्या कामाची पोचपावती व पुढे चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन असल्याचे सांगितले.
शिक्षणाधिकारी (प्रभारी) राजू तडवी यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. तसेच, पुरस्कार विजेत्या शिक्षकांचे खास अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here