By मंगेश वरवडकर

@maharashtracity

भारत श्री विजेत्याचे जोरदार स्वागत

मुंबई: “आयकरचा सागर कातुर्डे भारत श्री.” ठळक शब्दातील या बातमीमुळे आयकर विभागात सेवा देणाऱ्या हजारो कर्मचारी, अधिकाऱ्यांची छाती अभिमानाने फुगली. आयकरसाठी (Income Tax department) अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या या चॅम्पियनचे शेकडोच्या संख्येने उपस्थित कर्मचाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत आणि कौतुक केले. एवढेच नव्हे आयकर विभाग आपल्या या विजेत्यावर रोख पुरस्कारांचा वर्षाव करून त्याला मालामालही करणार असल्याची माहितीही आयकर विभागाच्या क्रीडा आणि रिक्रेएशन क्लबने (ITSRC) दिली.

गेली 15 वर्षे शरीरसौष्ठवात (body building) आपले नशीब आजमावत असलेल्या सागर कातुर्डेसाठी (Sagar Katurde) नववर्ष संस्मरणीय ठरले आहे. त्याने वर्षाच्या प्रारंभीच तेलंगणाच्या (Telangana) खम्मम येथे झालेल्या 13 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत (National Championship) आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.

आजवर अनेकदा भारत श्री स्पर्धेत (Bharat Shree competition) गटविजेतेपदावर समाधान मानणाऱ्या सागरने पहिल्यांदाच भारत श्रीचा किताब जिंकला. हे जेतेपद सागरच नव्हे तर आयकरसाठीही ऐतिहासिक ठरले आहे.

एक शरीरसौष्ठवपटू म्हणून आयकरचा खेळाडू पहिल्यांदाच भारत श्री ठरला आहे. या किताबामुळे आयकर भवनात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. विजयानंतर प्रथमच आयकर भवनात येत असलेल्या वीराचे स्वागत करण्यासाठी आयकर भवनात मोठी गर्दी झाली होती. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.

आपल्या वीराचे कौतुक करून त्याची पाठ खुद्द आयकर विभागाचे मुख्य आयुक्त आनंद शरण सिंग यांनी थोपटली. याप्रसंगी सागरचे कौतुक करून त्याच्या भावी क्रीडा कारकीर्दीसाठी शुभेच्छा देण्यासाठी ऍडमिनचे आयुक्त संजयकुमार शाही, अतिरिक्त आयुक्त मलिल्कार्जुन उत्तुरे, अतिरिक्त आयुक्त नितीन वाघमोडे आणि ऍड़मिनचे उपायुक्त अण्णासाहेब वाघेही उपस्थित होते.

सागरची क्रीडा कारकीर्द आंतरराष्ट्रीय पातळीवर बहरावी म्हणून रेल्वे जसे आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देते तसेच प्रोत्साहन आणि पाठिंबा सागरलाही मिळवून देऊ, असे आश्वासन रिक्रेएशन क्लबचे सदस्य विजय झगडे यांनी दिले.

“सागर कातुर्डेने केलेला पराक्रम आयकर विभागासाठी अभिमानास्पद बाब आहे. सागरने भारत श्री जिंकून आपली कामगिरी चोख बजावली आहे. आता त्याच्या पराक्रमाचे कौतुक करणे, त्याचा सन्मान करणे हे आमचे परम कर्तव्य आहे. आयकरचे बहुतांश अधिकारी घरातूनच आपले कर्तव्य बजावत असल्यामुळे सागरला दिला जाणारा पुरस्कार आज अधिकृतपणे जाहीर करता आला नाही. परंतु या पुरस्कारांसाठी सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे सागरच्या झोळीत मोठी रक्कम जमा होणार असून त्या सन्मानाने आमचा खेळाडू आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मालामाल होईल.”

  • वीरेंद्र पेडणेकर, सरचिटणीस, आयटीएसआरसी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here