@maharashtracity

मुंबई: ताडदेव, येथील ‘कमला’ या तळमजला अधिक २० मजली इमारतीमध्ये १९ व्या मजल्यावर २२ जानेवारी रोजी लागलेल्या भीषण आगीमुळे गंभीर जखमी झालेल्या धवल साळसकर (२३) यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी मसीना रूग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे सदर दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ९ वर गेली आहे.

या भीषण आगीमुळे ६ जणांचा होरपळून व आगीचा धूर नाकातोंडात गेल्याने गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला होता तर २४ जण जखमी झाले होते.

या घटनेत एकूण ३० जण जखमी झाले होते. त्यापैकी आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जणांना बरे वाटल्याने रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. तर उर्वरित ८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

५ दिवसांत आणखीन ३ गंभीर जखमींचा मृत्यू

ताडदेव येथील आगीच्या दुर्घटनेत २२ जानेवारी रोजीपर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर गंभीर जखमींपैकी एक मनीष सिंह (३८) यांचा उपचारादरम्यान २४ जानेवारी रोजी नायर रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे सदर दुर्घटनेतील मृतांची संख्या ७ वर गेली होती. त्यानंतर २७ जानेवारी रोजी दुपारी कस्तुरबा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या माधुरी चोपडेकर यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे सदर दुर्घटनेत मृत पावलेल्यांची संख्या ६ वरून ८ वर गेली होती.

मात्र शुक्रवारी २८ जानेवारी रोजी आणखीन एक गंभीर जखमी धवल साळसकर (२३) यांचा उपचारादरम्यान मसीना रूग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे सदर दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ९ वर गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here