@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन (solid waste management of BMC), आपत्ती व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात आलेली वन लागवड आदी बाबी प्रशंसनीय आहेत. अंटानानारिवो शहरासाठी या सर्व बाबी शिकण्यासारख्या आहेत, असे गौरवोद्गार मादागास्कर देशातील राजधानीचे शहर असलेल्या ‘अंटानानारिवो’ चे महापौर श्री. फ्रँक मायकल नायना आंद्रियांसीथायना यांनी काढले आहेत.

त्यांनी शिष्टमंडळासह मुंबई महापालिका मुख्यालयास मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेने केलेल्या विकासकामांचे तोंडभरून कौतुक केले.

यावेळी, श्री. आंद्रियांसीथायना यांच्यासमवेत कार्यालय प्रमुख श्री. गाय रझाफिन्ड्रालॅम्बो, केंद्र सरकारच्या अखत्यारितील इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सच्या (Indian Council for Cultural Relations) प्रादेशिक संचालक श्रीमती रेनू प्रीथियानी उपस्थित होते.

याप्रसंगी, पालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी श्री. आंद्रियांसीथायना व त्यांच्या सहकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

श्री. आंद्रियांसीथायना व त्यांचे सहकारी शिष्टमंडळ सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. सोमवारीच त्यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यानंतर आज या शिष्टमंडळाने महापालिका मुख्यालयास भेट देऊन पुरातन वारसा असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीची पाहणी केली.

यावेळी, अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी, मुंबई शहराबाबत आणि या शहरात मुंबई महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध सुविधा, जनहितार्थ राबविण्यात आलेले व प्रस्तावित प्रकल्प आदींबाबतची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे सादर केली.

तर, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संगीता हसनाळे यांनी घनकचरा व्यवस्थापन, दारिद्र्य निर्मूलन (Eradication of poverty), कोविड कालावधीमध्ये महापालिकेने बेघर, गरीब- गरजू, कामगार आदींसाठी केलेले अन्न वितरण (distribution of food packats during corona pandemic) इत्यादींबाबत सादरीकरण केले.

अंटानानारिवो (Antananarivo) हे मादागास्करमधील (Madagascar) सर्वात मोठे आणि राजधानीचे शहर आहे. मुंबई महानगराच्या तुलनेत या शहराचे भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्या अत्यंत कमी असली तरी मादागास्कर मधील मोठे शहर म्हणून अंटानानारिवोचे आर्थिक उलाढालीत मोठे योगदान आहे.

मुंबई महापालिकेकडून शहरात राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन (disaster management), प्रदूषण नियंत्रणासाठी (pollution control) वन लागवड आदींबाबत अंटानानारिवो शहराला खूप काही शिकण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार महापौर श्री. फ्रँक मायकल नायना आंद्रियांसीथायना यांनी काढले.

याप्रसंगी, पालिका प्रशासनातर्फे, उपआयुक्त (उद्याने) रमाकांत बिरादार, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संगीता हसनाळे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) अशोक यमगर, प्रमुख लेखापाल (वित्त) प्रदीप पडवळ, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प) सुनील सरदार, प्रमुख अधिकारी (व्यवसाय विकास) शशी बाला व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here