@maharashtracity

कंत्राटदारांच्या खिशात अतिरिक्त 3 कोटी घालणार!

मुंबई: मुंबईत कोट्यवधी रुपये खर्चून पादचाऱ्यांसाठी उभारलेले ‘स्कायवॉक’ हे पांढरा हत्ती ठरत आहेत. या स्कायवॉकबाबत पालिका प्रशासनाने ‘श्वेतपत्रिका’ काढावी, अशी मागणी पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. (Opposition demands white paper on Skywaks)

मंगळवारी पार पडलेल्या पालिका स्थायी समितीच्या बैठकीत, उत्तर मुंबईतील स्कायवॉक बांधकामाच्या खर्चात ३ कोटींची वाढ करून कंत्राटदाराला १९ कोटी रुपयांचे कंत्राटकाम देण्याबाबत पालिका प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा (Opposition leader Ravi Raja) यांनी मुद्दा उपस्थित करीत स्कायवॉकवरील विषयाला वाचा फोडत आपला तीव्र संताप व्यक्त केला.

मुंबईत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून पादचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेले ‘स्कायवॉक’ (skywalk) हे महिलांसाठी असुरक्षित ठरत आहेत. तर फेरीवाले या स्कायवॉकचा बेकायदा वापर करीत असून गर्दुल्ल्यांनी तर या स्कायवॉकला आपला अड्डाच बनवलेला आहे.

Also Read: ‘अविघ्न’ टॉवरमधील भीषण आगीला शॉर्टसर्किट कारणीभूत

त्यामुळे आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही स्कायवॉक उभारण्यामागील उद्देश सफल होत नसल्याची तक्रार रवी राजा यांनी केली.

तसेच, कोट्यवधी रुपये खर्च केल्यावरही पादचारी या स्कायवॉकचा अवश्यक तेवढा वापर करताना दिसत नाहीत. त्यामुळे मुंबईतील स्कायवॉकचा वापर रोज किती मुंबईकर करतात, या स्कायवॉकच्या देखभाल व दुरुस्ती कामांवर आतापर्यंत किती खर्च करण्यात आला आहे ? किती प्रमाणात त्याचा वापर होतो ? आदिबाबत पालिका प्रशासनाने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.

  • – तर स्कायवॉकचा उपयोग काय ? – भाजप

सायन रेल्वे स्थानक (Sion railway station) परिसरात पादचाऱ्यांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन स्काय वॉक बांधण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात हा स्कायवॉक पादचाऱ्यांविना ओस पडला आहे. दर ३ वर्षांनी या स्कायवॉकच्या देखभाल व दुरुस्ती कामांवर आणखीन काही कोटींचा खर्च करण्यात येतो.

जर पादचारी या स्कायवॉकचा वापरच करीत नसतील तर या स्कायवॉकचा उपयोग काय? असा सवाल भाजपच्या (BJP) नगरसेविका राजश्री शिरडवडकर यांनी उपस्थित करीत पालिका प्रशासनावर चांगलीच तोफ डागली.

तसेच, वांद्रे (पूर्व) येथे काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला स्कायवॉक पादचारी वापर करीत नसल्याने अखेर पाडून टाकण्यात आला. त्यामुळे या स्कायवॉकवर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्चही वाया गेला.

वास्तविक, एमएमआरडीए प्राधिकरण (MMRDA) हे पादचाऱ्यांच्या सोयीच्या नावाखाली कोटीवधी रुपये खर्चून स्कायवॉक बांधते. तसेच, या स्कायवॉकच्या देखभाल व दुरुस्ती कामांवर मुंबई महापालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र, तो वाया जात आहे.

मग अशा स्कायवॉकच्या देखभाल व दुरुस्ती कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च हवाय कशाला? जर कोट्यवधी रुपयांच्या स्कायवॉकचा वापर होत नसेल तर त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च कशाला करायचा, असे प्रश्न नगरसेविका राजेश्री शिरवाडकर यांनी यावेळी उपस्थित करीत पालिका प्रशासनाला चांगलेच फैलावर घेत जाब विचारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here