@maharashtracity

मुंबई: गेल्या २१ महिन्यापासून मुंबईला कोरोनाने (corona) घेरलेले असताना यंदा मात्र मुंबईत अवयवदान (organ donation) मोहिमेला वेग आला असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत कोरोनाची लाट नियंत्रणात येताना असताना २०२१ च्या शेवटच्या डिसेंबर महिन्यात मुंबईतील ३३ वे यशस्वी अवयवदान झाल्याचे विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समितीकडून सांगण्यात आले.

दिनांक १८ डिसेंबर रोजी ५१ वर्षीय मेंदूमृत (brain dead) पुरुष रुग्णाच्या अवयवदानाने तिघांना नवजीवन मिळाले. गेल्या वर्षी २०२० मध्ये संपूर्ण वर्षभरात केवळ ३० अवयव दान नोंद झाली होती. यंदा मात्र अवयवदानाची संख्या ३३ वर पोहचली आहे.

अद्याप वर्ष संपण्यास आठवडा बाकी असून अवयवदानाची संख्या वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे. यावर मुंबई विभागीय अवयवदान व प्रत्यारोपण समिती (Zonal Transplant Coordination Center – ZTCC) समन्वयक संगीता देसाई यांनी सांगितले की, १८ डिसेंबर रोजी परळच्या खासगी रुग्णालयात ५१ वर्षीय व्यक्तीला मेंदू मृत घोषित करण्यात आले.

हा रुग्ण मेंदूमृत अवस्थेत गेल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी त्या व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या मृत व्यक्तीच्या दोन्ही मूत्रपिंडांसह (Kidney) यकृत (Liver) दान करण्यात आले. या अवयवदानाचा तीन रुग्णांना लाभ झाला. झेडटीसीसीच्या नियमावली नुसारच हे अवयवदान पार पडले आहे.

दरम्यान, पुढच्या अवयवदानाला या पेक्षाही चांगला प्रतिसाद मिळेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे झेडटीसीसीकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here