@maharashtracity

मुंबई: चित्रपट दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याच्या पार्टीत सहभागी त्या मंत्र्यांची नावे भाजपचे नेते आ. आशिष शेलार यांनी जाहीर करावीत अन्यथा माफी मागावी, असे आव्हान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी भाजपला दिले आहे.

केंद्रात सत्ताधारी व मुंबईत पहारेकरी असलेल्या भाजप (BJP) व राज्यातील आणि मुंबई महापालिकेतील (BMC) सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) यांच्या नेत्यांमध्ये लहान – मोठ्या कारणांवरून शाब्दिक चकमकी झडत आहेत. अगदी शिवराळ भाषा वापरणे आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाणे इतपर्यंत प्रसंग ओढवले आहेत.

कधी कोस्टल रोड (coastal road), कधी पेंग्विन (Penguin), तर कधी मुंबईतील कोविड केंद्रावरील (covid Center) कोट्यवधीचा खर्च अशा काही प्रकरणांवरून शिवसेना व भाजप यांच्यात सतत खटके उडत आहेत.

चित्रपट दिग्दर्शक करण जोहर (Bollywood director Karan Johar) याच्या पार्टीत सहभागी झालेल्या करिना कपूरला (Kareena Kapoor) कोविडची बाधा झाल्याने चर्चेला उधाण आले होते. याच करण जोहर याच्या पार्टीत राज्य शासनाच्या मंत्रिमंडळातील मंत्री हजर होते, असा आरोप भाजपचे नेते व आ. आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी केले होते.

हे आरोप शिवसेनेला चांगलेच झोंबले होते. त्यामुळे आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक पत्रकार परिषद घेऊन, दिग्दर्शक करण जोहर याच्या पार्टीत सहभागी त्या मंत्र्यांची नावे भाजपचे नेते आ.आशिष शेलार यांनी जाहीर करावीत अन्यथा माफी मागावी, असे आव्हान भाजपला दिले आहे.

आ.आशिष शेलार यांनी केलेले आरोप पुराव्यासह सिद्ध करून दाखवावेत, असे आव्हान महापौरांनी दिले आहे. तसेच, महापालिकेच्या प्रत्येक कामात घोटाळ्यांचा आरोप करताना त्याचे पुरावेही द्या, अन्यथा जनतेची माफी मागा, असे त्यांनी भाजप नेत्यांना सुनावले आहे.

तसेच, आ. शेलार हे अगोदर मुंबई महापालिकेत नगरसेवक व गटनेते राहिले असून त्यांनी यापूर्वी मंत्रीपदही भूषवले आहे. मात्र त्यांचे मंत्रिपद गेले तरी ते मुंबई महापालिकेतच घुटमळत आहेत. तुमचे नगरसेवक अकार्यक्षम आहेत का आणि तुम्ही तेवढे हुशार आहात का, या शब्दात महापौरांनी आ. शेलार यांच्यावर टिका केली आहे.

सेलिब्रिटींच्या (celebrities) पार्टीवर पालिकेने कारवाई केली आहे. त्यामुळे आता सुई लावण्याचे काम करु नका. ज्या मंत्र्याचा उल्लेख केलात, त्या मंत्र्याचे नाव जाहीर करून तो मंत्री उपस्थीत असल्याचे पुरावे द्या, असे आव्हान महापौरांनी आ. शेलार यांना दिले आहे.

अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) प्रकरणातही असेच आरोप केले होते. मात्र, त्यांच्यावर तोंडावर पडण्याची वेळ आली, असा टोलाही महापौरांनी भाजपला लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here