@maharashtracity

“व्हर्च्युअली वाईल्ड”आभासी सफरीच्या दुसऱ्या भागाचे महापौरांच्या हस्ते अनावरण

मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील (राणी बाग) पेंग्विन कक्षात ठेवण्यात आलेल्या ‘हम्बोल्ट पेंग्विन’चे मुंबईत आगमन झाल्यापासून आतापर्यंत झालेला यशस्वी प्रवासाबद्दल प्राणिसंग्रहालयाने तयार केलेल्या चित्रफितीचा (video film on Humboldt Penguin) मुंबईकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी केले आहे.

पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे १ ते ७ ऑक्टोंबर २०२१ या कालावधीत “वन्यजीव सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. या वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ आणि वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या “व्हर्च्युअली वाईल्ड” (Virtual Wild Safari) आभासी सफरीच्या मालिकेच्या दुसऱ्या भागाचे अनावरण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते १ ऑक्टोंबर २०२१ रोजी ‘थ्रीडी प्रेक्षागृह’ पेंग्विन सभागृह (राणी बाग) (Ranicha baug) येथे पार पडले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात महापौर बोलत होत्या.

भायखळा येथील प्राणिसंग्रहालयातील हम्बोल्ट पेंग्विन संदर्भात तयार करण्यात आलेल्या चित्रफितीमध्ये, पेंग्विन मुंबईत आल्यापासून आतापर्यंत केलेला यशस्वी प्रवास, त्याचे संगोपन कसे केले याबाबतची सखोल माहिती देण्यात आली असून संपूर्ण मुंबईकरांसाठी भूषणावह बाब आहे, असे महापौर पेडणेकर यांनी सांगितले.

प्राणीसंग्रहालयात नुकत्याच जन्मलेल्या ‘ओरिओ’ची (पेंग्विन) (Oreo Penguin) ज्या पद्धतीने काळजी घेण्यात येते, हे बघितल्यानंतर प्राण्यांमध्ये असलेले प्रेम आपल्या लक्षात येते. तसेच, डॉक्टर पेंग्विनची ज्या पद्धतीने काळजी घेत आहे ते सर्व या चित्रफितीत बघण्यासारखे असल्याचे महापौरांनी सांगितले.

यावेळी, ओरिओच्या जन्मानिमित्त महापौरांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला.
प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी यांनी, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे देशातील जुन्या प्राणिसंग्रहालयांपैकी एक असल्याचे सांगितले.

दुर्मिळ प्राणी व पक्षी यांचे संरक्षण व संवर्धन करणे, त्यांचे प्रजनन घडवून आणणे या बरोबरच, त्यांचे विषयी नागरिकांच्या व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थांच्या मनात आपुलकी निर्माण करण्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करणे हे देखील प्राणिसंग्रहालयाच्या स्थापनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राणी व पक्षी , कीटक, फुलपाखरे, झाडे, पर्यावरण याबद्दल लोकांना माहिती देणे हा मुख्य उद्देश आहे.

@themumbaizoo या नावाने असलेल्या सर्व समाज माध्यमांवर (फेसबुक, ट्विटर, यू – ट्यूब, इंस्टाग्राम) ‘प्राणिसंग्रहालयच्या व्‍हर्च्‍युअल टूर’ (आभासी सहल) ची ध्वनिचित्रफीत सर्वाना पाहता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here