@maharashtracity

कोविड नियमांचे पालन करून छोट्या पेंग्विन नराचे ‘ऑस्कर’ नामकरण

वाघांच्या बछड्याचे ‘विरा’ नामकरण

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते नामकरण

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या राणी बागेतील (Rani chi baug) पेंग्विन व वाघांच्या बछड्यांचा नामकरण विधी सोहळा अखेर मंगळवारी कोविड नियमांचे पालन करून महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या हस्ते केक कापून संपन्न झाला.

राणीच्या बागेत बंगाल वाघाची (Bengal tigers) जोडी शक्ती (नर) व करिष्मा (मादी) यांनी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी जन्म दिलेल्या मादी बछड्याचे नाव ‘विरा’ (Veera) असे ठेवण्यात आले आहे. तर हम्बोल्ट पेंग्विन (Humboldt penguin) कक्षातील मोल्ट (नर) व फ्लिपर (मादी ) यांच्या जोडीने १८ ऑगस्ट २०२१ रोजी जन्म दिलेल्या पेग्विन नर पिल्लाचे ‘आँस्कर’ (Oscar) असे नाव ठेवण्यात आले आहे.

राणीच्या बागेत यापूर्वी, हम्बोल्ट पेग्विन कक्षातील डोनाल्ड (नर) व डेझी (मादी ) यांनी १ मे २०२१ रोजी जन्म दिलेल्या नर पिल्लाचे नाव ‘ओरिओ’ असे ठेवण्यात आले होते.

या नामकरण सोहळ्याला राणी बागेतील उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, डॉ. कोमल राऊळ आदि मान्यवर उपस्थित होते.

औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डन
प्राणीसंग्रहालयातून बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर) व करिष्मा ( मादी) यांना १२ फेब्रुवारी २०२० रोजी राणीच्या बागेत आणण्यात आले होते. पालिकेने, राणीच्या बागेत वाघाकरिता नव्याने तयार केलेल्या नैसर्गिक अधिवासात त्यांना ठेवण्यात आले.

येथे कृत्रिम धबधबा, पारदर्शक काचेची प्रदर्शनी, झाडे, झुडपे आदी छानशा हिरवळीच्या सान्निध्यात बंगाल वाघाच्या जोडीने एका मादी बछड्याला १४ नोव्हेंबर २०२१ रोजी जन्म दिला. तिचेच नाव आता ‘वीरा’ असे ठेवले असून ती आता दोन महिन्याची झाली आहे. नर व मादी आणि नवीन बछडा सुखरूप आहेत. बछडा आपल्या आई- वडिलांसोबत मजेत राहत आहे. हिरवळीचा आनंद लुटत आहे.

‘विरा’ सहा महिन्यांची होईपर्यंत तिला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून तिला जंताची औषधे व लसीकरण करण्यात येत आहे. पशुवैद्यकांच्या उपस्थितीत फक्त प्राणीपालास बछड्याजवळ जाण्याची परवानगी देण्यात आली असून तिला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here