@maharashtracity

आता शाळा 1 ऐवजी 15 डिसेंबरपासून सुरू होणार

पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना प्रवेश -: शिक्षण अधिकारी

मुंबई: कोरोनाचा नवीन प्रकार असलेल्या ‘ओमीक्रॉंन’ या विषाणूपासून बचाव करण्यासाठी अधिक काळजी घेण्यात येत आहे. याच अनुषंगाने मुंबई महापालिका प्रशासनाने इयत्ता १ ली ते ७ वी च्या शाळा १ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबर रोजी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पालकांच्या संमतीपत्राद्वारेच विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना ऑनलाईन शिक्षण (online education) घेता येणार आहे, अशी माहिती पालिका शिक्षण अधिकारी (प्रभारी) राजू तडवी यांनी दिली आहे.

वास्तविक, संपूर्ण राज्यात इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून २९ नोव्हेंबर रोजी जीआर (GR) प्राप्त झाला आहे. पालिका शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने तशी तयारीही सुरू केली होती. मात्र ओमीक्रॉंन (Omicron) या नवीन विषाणूचा धोका जगभरात वाढल्याने या निर्णयात आता बदल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पालिका आयुक्त यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे, असे राजू तडवी यांनी सांगितले.

Also Read: ज्येष्ठ एड्सग्रस्तांच्या भावनांना सपोर्ट ग्रुपचा आधार

दिनांक १५ डिसेंबरपासून मुंबईत इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी आणि सॅनिटायझेशन करणे याबाबतचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने वरीलप्रमाणे निर्णय घेतला आहे, असे राजू तडवी यांनी सांगितले.

१५ डिसेंबरसाठी पालिकेचे नियोजन

१५ डिसेंबरला शाळा सुरू होण्यापूर्वी शाळांमध्ये स्वच्छता व सॅनिटायझर फवारणी करण्यात येणार आहे. पालकांच्या संमतीपत्रानेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यात अडचण वाटत असेल तर त्यांना घरी बसूनच ऑनलाइन पद्धतीनेच शिक्षण दिले जाणार आहे.

तसेच, कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल. शारीरिक अंतर राखण्यासाठी शालेय वर्गात एका बेंचवर एक विद्यार्थी बसणार आहे. शाळेत किमान २ ते ३ तास शिक्षण दिले जाणार आहे. तसेच, गृहपाठावर जास्त भर देण्यात येणार आहे. मात्र शाळेत मैदानी खेळ खेळले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप केले जाणार आहे.

शाळा, विद्यार्थी संख्या

इयत्ता १ ली ते ७ वीचे वर्ग असणार्‍या शाळा -: ३४२०

इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे विद्यार्थी -: १० लाख ५० हजार

महापालिकेच्या शालेय इमारती -: ४५०

महापालिकेचे एकूण विद्यार्थी -: २ लाख ९२ हजार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here