@maharashtracity

भाजप खा. मनोज कोटक यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

मुंबई: कोट्यवधी रुपये खर्चून सायकल ट्रॅक उभारण्यासाठी पवई तलावांत भरणी टाकल्यास पवई तलावाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशी भिती भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी व्यक्त केली आहे. (BJP MP Manoj Kotak is concern about Powai lake)

त्यांनी याबाबत एक पत्र पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC commissioner IS Chahal) यांना पाठवले आहे. सायकल ट्रॅक उभारताना पवई तलावाचे अस्तित्व जपण्यात यावे, अशी मागणी त्या पत्रात केली आहे.

सायकल ट्रॅकसाठी पवई तलावाच्या काही भागात भरणी टाकण्यास पर्यावरण प्रेमींनी यापूर्वीच विरोध केला आहे. आता भाजपनेही विरोधी सूर लावला आहे.

पवई तलाव परिसरात सायकल ट्रॅक उभारणीच्या नावाखाली तलावात उगाचच भरणी टाकल्यास त्या तलावाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवई तलावाचे क्षेत्रफळ कोणत्याही परीस्थीतीत कमी करु नये आणि तलावातील जैवविविधतेला धोका निर्माण करुन हा सायकल ट्रॅक उभारू नये, अशी भाजपची भुमिका असल्याचे कोटक यांनी सांगितले.

सहसा गोड्या पाण्यात मगरी आढळत नाहीत. अपवाद चंबळ नदीत आणि त्यानंतर पवई तलावातच गोड्या पाण्यात मगरी आढळतात. त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला कोणताही धोका पोहचवू नये, असे खासदार कोटक यांनी म्हटले आहे.

४०५ कोटींचा सायकल ट्रॅक

पवई तलावाच्या परिसरात ९ किमी लांबीचा सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी, महापालिका ४०५ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे, असे समजते.

सांडपाणी रोखण्यात अपयश

पवई तलावाच्या परिसरातून गेल्या दहा वर्षांपासून १७ वाहिन्यांमार्फत तलावात सांडपाणी सोडण्यात येत आहे. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चूनही आजपर्यंत हे सांडपाणी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात पालिका अपयशी ठरल्याचे, खासदार मनोज कोटक यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here