@maharashtracity

कंत्राटदारांनी बुजवले फक्त ९ हजार १२६ खड्डे
पालिका कर्मचाऱ्यांनी बुजवले २४ हजार ३० खड्डे

मुंबई: मुंबई महापालिका (BMC) दरवर्षी रस्ते निर्मितीवर हजारो कोटी रुपये खर्च करते. त्यानंतरही दरवर्षी पावसाळ्यात डांबरी रस्त्यांवर खड्डे पडतातच. हे खड्डे बुजविण्यासाठी आणखीन काही कोटी रुपये खर्च करण्यात येतो. कंत्राटदार खड्डे बुजविताना पालिकेला चांगलाच चुना लावतात.

यंदाही कंत्राटदारांनी रस्त्यावरील फक्त ९ हजार १२६ खड्डे (potholes) बुजवले आहेत तर पालिका कर्मचाऱ्यांनी मात्र तब्बल २४ हजार ३० खड्डे बुजवले आहेत. पालिकेने ९ एप्रिल ते ११ सप्टेंबर २०२१ या कालावधीत पालिका व कंत्राटदार यांनी विविध रस्त्यांवरील ३३ हजार १५६ खड्डे बुजविल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

सध्या गणेशोत्सव (Ganesh Festival) सुरू आहे. आजही काही रस्त्यांवर लहान, मोठे खड्डे बुजवणे बाकी आहे. मंगळवारी पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. मात्र गणेशोत्सवात जर खड्ड्यांमुळे गणेश विसर्जनात काही बाधा आल्यास अथवा एखादी दुर्घटना घडल्यास त्यास पालिका प्रशासन व कंत्राटदार हे दोघेही जबाबदार असणार आहेत.

पालिकेने, गणेश विसर्जनापूर्वीच विविध रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामासाठी प्रशासकीय विभागनिहाय २४ संयुक्त पथके नियुक्त केली आहेत. सर्व विभाग कार्यालये व रस्ते विभाग यांच्या समन्वयातून खड्डे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

या पथकांत, विभाग कार्यालये आणि रस्ते विभाग यांचा या पथकांमध्ये समावेश आहे. ही पथके खड्डे बुजविण्याच्या कामकाजामध्ये योग्य समन्वय साधणार आहेत.

मुंबई महापालिका प्रशासनाने ९ एप्रिल ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये पालिका हद्दीतील रस्त्यांवरील ३३ हजार १५६ खड्डे बुजवले आहेत. त्यासाठी पालिकेच्या वरळी स्थित अस्फाल्ट प्लांट येथे निर्मित केलेल्या २ हजार ७५० मेट्रिक टन कोल्डमिक्स २४ विभाग कार्यालयात वितरित करण्यात आलेले आहे. त्यातून आतापर्यंत विभाग कार्यालयातील उपलब्ध कर्मचाऱ्यांमार्फत २४ हजार ३० खड्डे बुजविण्यात आलेले आहेत.

तर, कंत्राटदारांकडून २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत ९ हजार १२६ खड्डे बुजविण्यात आले आहेत. तसेच, प्रकल्प रस्ते व दोष दायित्व कालावधीत असलेले रस्ते हे संबंधित नियुक्त कंत्राटदाराकडून निविदेतील अटी व शर्तींनुसार मर्यादीत वेळेत तसेच विनामूल्य भरण्यात येतात.

अस्फाल्ट रोडमध्ये असलेल्या बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे ही नित्य प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेता, खड्डयांची समस्या निकाली काढण्यासाठी टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण (cement concrete) होऊन खड्डय़ांचा प्रादुर्भाव कमी होणार असल्याचा दावा पालिकेतर्फे करण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here