@maharashtracity

मुंबई: कांदिवलीत हिरानंदानी खासगी सोसायटीमध्ये खासगी लसीकरण प्रक्रियेअंतर्गत बोगस लसीकरण झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई महापालिकेने त्याची गंभीर दखल घेतली आहे. तसेच, या प्रकरणी पालिका उपयुक्त विश्वास शंकरवार यांची एक चौकशी समिती नेमली असून ही समिती ४८ तासातच चौकशी अहवाल सादर करणार आहे.

यासंदर्भातील माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईमध्ये १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले. अगोदर पालिका, सरकारी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर लसीचा डोस देण्यात येत होता. नंतर खासगी लसीकरण केंद्रांवरही लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता खासगी रुग्णालयामार्फत खासगी सोसायटीमध्येही लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

कांदिवली येथील हिरानंदिनी सोसायटीमध्ये ३० मे रोजी ३९० लोकांना बोगस लसीकरण झाल्याचे समोर आले आहे. कारण लसीकरणानंतर चार तास उलटूनही नागरिकांना अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले नाही. तसेच, लस घेतल्यानंतर रहिवाशांना ताप, अंग दुखी यासारखे शारीरिक त्रास जाणवले नाहीत.

त्यामुळेच, लस घेणाऱ्या रहिवाशांनी लसीकरणाबाबत संशय व्यक्त केला. त्यानंतर काही लोकांनी मिळून थेट कांदिवली पोलीस ठाणे गाठून बोगस लसीकरणाबाबत लेखी तक्रार दाखल केली.

या गंभीर घटनाप्रकारामुळे भाजपचे आमदार योगेश सागर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या बोगस लसीकरण प्रकरणाची मुंबई पोलिसांनी सखोल चौकशी न केल्यास सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे. या बोगस लसीकरणाप्रकरणी पालिकेने उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्फत चौकशी समिती नेमली असून पुढील ४८ तासात चौकशी अहवाल सादर करण्यात येणार आहे.

खासगी केंद्रांवर अंकुश राहावा यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेचा अंकुश ठेवा असे सांगत होतो. मात्र खासगी रुग्णालयांना मोकळीक देण्यात आल्याने ते काय करतात याची माहिती पालिका आणि राज्य सरकारला देत नाहीत. यामुळेच असे प्रकार घडतात. खासगी लसीकरण केंद्र काय करतात याची माहिती महापालिका आणि राज्य सरकारला द्यायलाच पाहिजे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here