@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) झालेल्या गॅस गळतीला पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत होता की अन्य काही कारणे होती, याची चौकशी होणार आहे. या दुर्घटनेचे पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या आगामी बैठकीत उमटणार आहेत.

या घटनेबाबत जर पालिकेने स्वतःहुन निवेदन केले नाही आणि समाधानकारक माहिती न दिल्यास प्रशासनाला याप्रकरणी जाब विचारण्यात येईल, असा इशारा पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिला आहे.

कस्तुरबा रुग्णालयात दिनांक ७ ऑगस्ट रोजी एलपीजी टॅंकमधून अचानक गॅस गळती (Gas leakage) झाल्याने जीव धोक्यात आलेल्या कोरोनाबाधित २० रुग्णांसह ५८ जणांना स्थलांतरित करावे लागले होते.

सुदैवाने अग्निशमन दल व एचपीसीएलचे तज्ज्ञ यांनी वेळीच धावपळ करून युद्धपातळीवर उपाययोजना केल्याने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. मात्र, या घटनेला पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत होता किंवा कसे, हे आता चौकशीअंती उघड होणार आहे.

मुंबई महापालिकेचे महत्वाचे रुग्णालय असलेल्या कस्तुरबा या रुग्णालयात कोरोना व अन्य आजाराचे रुग्ण उपचार घेत असताना या रुग्णालयात एलपीजी गॅस टॅंकमधून अचानक गॅस गळती झाल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे भयभीत झाले होते.

या विषयावर बुधवारी खरमरीत चर्चा होण्याची शक्यता आहे. ही घटना का व कशी घडली, त्यास जबाबदार कोण, या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिका काय उपाययोजना करणार, आदी प्रश्नांचा भडिमार करून सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक यांच्याकडून प्रशासनाला चांगलाच जाब विचारला जाऊ शकतो. त्यावर प्रशासन काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here