@maharashtracity

धुळे: धुळे (Dhule) जिल्हयात पुरेसा पाऊस नसल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्हयात दुष्काळ (drought like situation) जाहीर करावा, अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांनी केली आहे.

आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ व शेतकर्‍यांनी आज जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी धुळे तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

आमदार कुणाल पाटील यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती देतांना सांगितले की, राज्यात अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला, महापूर आले. मात्र, धुळे जिल्हयात तीन – चार आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे.

पाटील म्हणाले, भूईतून निघालेली पिके कोमजू लागली आहेत. जिराईत शेतीकडे पाहिले तर जीव कासावीस होतो. बागायतदार शेतकरीसुध्दा विहिरीतील पाणी तळाला गेल्याने चिंतेत आहे. जिल्हयात अद्याप एकदाही मसुळधार पाऊस पडला नसल्यामुळे नद्या, नाले, ओढे कोरडेठाक आहेत. परिणामी विहिरींचा उद्भव आटत आला आहे. त्यामुळे जिराईत आणि बागाईत शेती करणारे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे.

ते पुढे म्हणाले, जिल्हयातील मध्यम, लघु आणि इतर पाटबंधारे प्रकल्पात पाण्याचा साठा अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. तीन आठवड्यापासून सोसाट्याचा वारा वाहत आहे. आभाळात ढगांची गर्दी होत आहे. पण पाऊस मात्र पडत नाही. गेल्या आठवड्यात कडक ऊन पडल्याने पिके अधिक प्रमाणात कोमजू लागल्याने पिकांची अवस्था नाजूक झाली आहे.

जिराईत आणि बागाईत शेतात जी काही पिके उभी आहेत ती पुरेसा पाऊस नसल्याने रोगराईला सामोरे जात आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वच चातकसारखी पावसाची वाट पाहत आहेत. एकीकडे शेतीचे हे संकट निर्माण झाले असतांना काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, याकडे आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचे लकढ वेधले.

“राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकर्‍यांचे सरकार असल्याचे गेल्या दोन वर्षात स्पष्ट झाले आहे. राज्यातील शेतकर्‍यांना दिलास देण्यासाठी, आर्थिक आधार देण्यासाठी या सरकारने कधीच मागेपुढे पाहिले नाही. आपण महाविकास आघाडी सरकारचे (MVA) प्रतिनिधी म्हणून धुळे जिल्ह्यातील ही अवर्षण प्रवण बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी आणि जिल्हयात दुष्काळ जाहिर करण्यात यावा”, अशी मागणी आ कुणाल पाटील यांनी केली.

या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक सर्वांनाच योजनेचा लाभ द्यावा, जिल्हयात कृत्रिम पाऊस (artificial rain) पाडण्याचा बाबतीत शासनस्तरावर आपण संवाद साधुन मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

दुष्काळी (scarcity) परिस्थितीबाबत शासनाला अहवाल पाठवून दुष्काळ जाहीर करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here