X: @maharashtracity

मुंबई: कुस्तीचा आखाडा गाजवणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विजय नथ्थू चौधरी आता पोलीसांचे क्षेत्रही गाजवतोय. अप्पर पोलीस अधीक्षक पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस अधिक्षक असलेल्या विजयला कुस्तीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह ‘ जाहीर करण्यात आले आहे.

राज्य पोलीस विभागात विविध पदांवर कार्यरत असून आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या कर्तृत्ववान पोलीसांना महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह या प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हॅटट्रिक नोंदविणार्‍या विजय चौधरीने महाराष्ट्र पोलीस दलात दोनवेळा सुवर्ण पदक जिंकले. तसेच २०२३ साली कॅनडा येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचावले होते.

भविष्यातील मोठ्या कुस्ती स्पर्धा तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव असेच उंचाविण्यासाठी मी अथक परिश्रम घेणार असल्याचे विजय चौधरीने सांगितले. पोलीस खात्याचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विजयवर चोहोबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व सन्मानचिन्ह विजेत्यांचे अभिनंदन केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जयजीत सिंह, निकेत कौशिक, विश्वास नांगरे पाटील, अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनामुळे विजय चौधरी पोलीस खात्यातही आपला दम घुमवू शकला आहे. सध्या विजय चौधरी आपले गुरू हिंदकेसरी रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदकेसरी आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here