26 एप्रिल रोजी पेण मध्ये जाहीर सभा!

X: @maharashtracity

महाड: राज्यातील तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी होणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी महायुती विरोधी महाविकास आघाडी असा जंगी सामना होत आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना मतदारसंघात होत असलेला विरोध पाहता त्यांच्या दिमतीला खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले असून 26 एप्रिल रोजी पेणमध्ये जाहीर सभेचे आयोजन केले आहे.

राज्यातील तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 11 लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात आजी-माजी खासदारांमध्ये दुरंगी लढत होत असून या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची केली असून या मतदारसंघातून यदाकदाचित तटकरेंचा पराभव झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात बॅकफुटवर जाईल अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांमध्ये चर्चिली जात आहे. त्यामुळे तटकरेंना निवडून आणण्यासाठी भाजपाच्या सहकार्याने अजित पवार गट तयारीला लागला आहे.

या मतदारसंघात मुस्लिम, कुणबी आगरी -कोळी या समाजाच्या मतांवर विजयाचे गणित अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांना या सर्व समाजातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. हे वास्तव सुनील तटकरे यांना माहित असले तरी नाक दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असल्याचे त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तटकरेंवर नाराज आहेत. त्यातच पक्षात दोन गट पडल्याने मूळ राष्ट्रवादीच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले आहे. या लोकसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात कोणतीही विकास कामे झालेली नाहीत. रस्ते, रेल्वे औद्योगिकीकरण व बेरोजगार तरुणांचा प्रश्न, आगरी -कोळी बांधवांचा, मच्छीमार समाजाचा प्रश्न, धनगर वाड्यांचे प्रलंबित प्रश्न, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पंधरा वर्षापासून भिजत पडलेला प्रश्न, यामुळे रायगडकर व रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूणमधील कोकणवासिय नाराज आहेत.

या सर्वांच्या विरोधाला डावलून तटकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी माजी खासदार अनंत गीते यांच्याशी त्यांना कडवी झुंज द्यावी लागत आहे

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील मोरबा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पटाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुस्लिम बहुसंख्य समाज असलेल्या मोहल्ला मध्ये झालेल्या 23 एप्रिल रोजीच्या जाहीर सभेमुळे मुस्लिम समाज तटकरेंपासून दुरावल्याचे चित्र सभेनंतर निर्माण झाले आहे. मुस्लिम समाजाचा वाढता विरोध पाहता मुस्लिम समाजाला आश्वासन देण्यासाठी खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तटकरेंच्या दिमतीला धावून आले असून त्यासाठी त्यांनी पेण येथे शुक्रवारी 26 एप्रिल रोजी जाहीर सभा आयोजित केली आहे.

या सभेनंतर मतदारसंघातील गणित बदलते का याची चाचपणी देखील होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here