X : @milindmane70

महाड: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर जाण्यासाठी अत्यंत कमी वेळेचा आणि सोपा असा मार्ग असलेला रायगड रोपवे प्रकल्पाच्या प्रशासनाने पुन्हा दोन ट्रॉलीसाठी मंजुरी असताना आधी तिसरी आणि आता चौथी ट्रॉली बसवली आहे.  या ट्रॉलीची चाचणी नुकतीच घेण्यात आली असली तरी हा प्रकार धोकादायक आहे. औद्योगिक सुरक्षा अधिनियम अंतर्गत सर्व यंत्रणांना धाब्यावर बसवून चौथ्या ट्रॉलीच्या केलेल्या चाचणी बाबत शंका व्यक्त केली जात आहे. 

किल्ले रायगडावर जाण्यासाठी जोग इंजिनिअरिंग कंपनीने रायगड रोपवेची निर्मिती केली. पूर्वीपासून पायवाट असल्याने या मार्गाला सुरुवातीच्या काळात विरोध झाला होता. मात्र हा विरोध झूगारून शासनाने रोपवे प्रकल्पाला परवानगी दिली गेली.  सध्या रायगडवर जाण्यासाठी पायी मार्ग असला तरी आबालाबुद्ध आणि तरुण या रोपवेचा आनंद घेत आहेत. शैक्षणिक सहलीतील मुलांना सूट असल्याने ते देखील रोपवेनेच प्रवास करताना दिसतात. गेले वीस वर्षाहून अधिक काळापासून हा प्रकल्प शिवप्रेमी आणि पर्यटकांना रायगडावर जाण्या – येण्याची उत्तम सुविधा पुरवत आहे. गडावरील गर्दी पाहता सध्या अस्तित्वात असलेला रोपवे कमी पडू लागला. त्यामुळे आणखी एक अद्ययावत रोपवे उभा केला जावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. 

राज्य शासनासह केंद्र शासनाने देखील त्याला दुजोरा दिला. मात्र नवीन प्रकल्पाची चर्चा सुरू होत असतानाच रायगड रोपवे ने प्रशासनाची परवानगी न घेता या ठिकाणी तिसरी ट्रॉली बसवल्याची चर्चा रायगड परिसरातील गावांमध्ये होती. 

रायगड रोपवे जवळील हिरकणी वाडी येथील जमिनींना पडणाऱ्या भेगा आणि होणारे भूस्खलन यामुळे रायगड रोपे परिसरात धोका निर्माण झाला होता. मात्र सत्ताधारी आणि रोपवे प्रशासन यांच्या संगनमताने याठिकाणी नियम, अटी झुगारून विविध परवानग्या देण्यात आल्या. आता नव्याने रायगड रोपवे प्रशासनाने दोन ट्रॉली असताना तिसरी व नंतर चौथी ट्रॉली बसवण्याचे काम कोणत्या अधिनियमाखाली केले? ते करत असताना याबाबत नागरिकांच्या सूचना व हरकती मागवल्या का? या सर्व नियमांना हरताळ फासण्याचे काम रायगड रोपवे प्राधिकरणाने केले असल्याचा आरोप केला जात आहे. 

रायगड रोपवे ने या चौथ्या ट्रॉलीची नुकतीच चाचणी घेतली. अजून काही चाचण्या घेण्यात येणार आहेत आणि यशस्वी चाचणी झाल्यानंतर तीचे लोकार्पण केले जाईल, असे रायगड रोपवे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या ट्रॉलीत ४ प्रवासीच बसविले जात आहेत. २३ तारखेला शिवपुण्यतिथी दिनी लोकार्पण सोहळा करुन नंतर रीतसर ती सुरू केली जाईल अशी शक्यता आहे. सध्या असलेल्या रोपवे करिता प्रत्येकी ३१० रू रिटर्न तर सिंगल मार्ग तिकीट २००/- रूपये आकारले जाते. जेष्ठ नागरिकांसाठी रिटर्न तिकीट २०० रुपये, ३ वर्षापेक्षा लहान मुलांना मोफत, वय वर्षे ३ व ४ मधील मुलांना तिकिट २००/- रूपये, ४ वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना पूर्ण तिकीट, दिव्यांगांना मोफत,शालेय  विद्यार्धी १ ते ७ पर्यंत रिटर्न १९०/- रुपये,  सिंगल १३०/-. ८ ते १२ पर्यंत २२५/- रिटर्न, सिंगल १९०/- असे तिकीट आकारले जात आहे.

नवीन शासकीय रोपवे प्रकल्प गुंडाळला का ?

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा, शिव पुण्यतिथी, शिवजयंती असे अनेक कार्यक्रम मोठ्या गर्दीमध्ये साजरे होतात. या वेळेला गर्दीचा उच्चांक मोडला जातो. यावेळी रायगड रोपवे ला चार ते पाच तासाची प्रतीक्षा असते, यामुळे अनेकांना रायगड न पाहताच परतावे लागते. याकरता नवीन शासकीय रोपवे उभा केला जावा, अशी मागणी पुढे आली होती. तसेच रायगड रोपवेच्या मनमानी कारभारामुळे व पर्यटकांना कोणतीही सोयी सुविधा न पुरवणाऱ्या रायगड रोपवेच्या गैरकारभारामुळे या ठिकाणी नवीन रोपवे, तो देखील पर्यटन विभागाच्या अधिपत्याखाली असावा, अशी मागणी वारंवार जोर धरू लागली आहे. त्यासाठी शासनाने जागेची पाहणी देखील केली होती. मात्र हा प्रकल्प गुंडाळण्याऐवजी सध्या अस्तित्वात असलेल्या रायगड रोपवे प्रशासनाकडून रोपवेमध्येच मनमानी पद्धतीने बदल केले जात आहेत.

रायगड रोपवेच्या मनमानी कारभाराबाबत युवराज संभाजी राजे भोसले यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. नवीन शासकीय रोपवे व्हावा, अशी आग्रही मागणी देखील त्यांनी केली होती. रोपवे प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात त्यांनी पत्र व्यवहार देखील केला होता. मात्र संभाजी राजे भोसले सत्तेत सामील झाल्यानंतर ही मागणी थांबली होती. आता चार ट्रॉली बसवल्यानंतर माजी खासदार युवराज संभाजी राजे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

किल्ले रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांची व शिवभक्तांची दररोज वाढती संख्या पाहता व देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी केंद्र शासनाने पर्यटन खात्याअंतर्गत अत्याधुनिक पद्धतीचा नवीन रोपवे उभारावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  याबाबत केंद्र शासनाने तातडीने प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी लाखो शिवभक्त व देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या तोंडून रायगड रोपवेच्या परिसरात ऐकण्यास मिळत आहे. रायगड रोपवे च्या मनमानी कारभाराला असंख्य पर्यटक व लाखो शिवभक्त त्रस्त झाले असून राज्य शासनाने तातडीने मार्ग काढून नवीन रोपे ची निर्मिती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here