X: @maharashtracity
मुंबई: महापालिका प्रशासनाने प्रमुख अभियंता ( स्थापत्य ) या पदावर पदोन्नती करताना नगर अभियंता खात्याने तयार केलेल्या सुधारित सेवा ज्येष्ठता यादीवर कोणत्याही हरकती सूचना न मागवता आणि सुनावणी न घेता ही यादी अंतिम करण्यात आल्याने ज्येष्ठ अभियंत्यांची नावे वगळण्यात आल्याच्या विरोधात उपप्रमुख अभियंता विभास आचरेकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
पालिका प्रशासनाने प्रमुख अभियंता ( स्थापत्य ) या पदावर पदोन्नती करताना दुय्यम अभियंता ( स्थापत्य ) पदाची १९९० ते २००० सालापर्यंतची सेवा ज्येष्ठता यादी ३० वर्षानंतर नगर अभियंता खात्याने सुधारित केली होती. ही नवीन यादी जानेवारी २०२४ मध्ये जाहीर करण्यात आली होती. मात्र सुधारित सेवा ज्येष्ठता यादीवर कोणत्याही हरकती सूचना न मागवता आणि सुनावणी न घेता ही यादी अंतिम करण्यात आली.
याचा परिणाम असा झाला की, यापूर्वी सेवाज्येष्ठता यादीत ज्या सेवा ज्येष्ठता अभियंत्यांची नावे होती, ती नावे वगळण्यात आल्याचा आरोप होत आहे. या यादीतून उपप्रमुख अभियंता विभास आचरेकर यांना डावलण्यात आले आहे. याविरोधात आचरेकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, प्रमुख अभियंता पदाच्या सुधारित सेवा ज्येष्ठता यादीत ज्येष्ठ अभियंत्यांना डावलून १० कनिष्ठ अभियंत्यांचा या यादीत समावेश करण्यात आल्याचा ही आरोप होत आहे.