X: @maharashtracity

ना महामार्ग पूर्ण, ना महाडमध्ये औद्योगिक विकास

मुंबई: रायगड लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादीचे खासदार व अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवडणुकीत दिलेल्या  वचनांचा विसर पडला आहे. त्या आश्वासनांचे काय झाले? असा सवाल ग्रामीण भागातील जनता तटकरे यांना विचारत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिलेले व काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, आर.पी.आय (गवई गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीचा पाठिंबा घेऊन २०१९ मध्ये विजयी झालेले खासदार सुनील तटकरे यांनी या लोकसभा मतदारसंघातील जनतेला जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासने पूर्ण केली असा प्रश्न मागील जाहीरनाम्याचे चित्र बघितल्यावर स्पष्ट होते. 

सुनील तटकरे यांनी त्यावेळी एक संकल्पपत्र प्रसिद्ध केले होते. या संकल्प पत्रात तटकरे यांनी नमूद केले होते की, “मुंबई लगत असणाऱ्या रायगडमध्ये विकासाच्या अगणित संधी आहेत. मुंबईसाठीचे सेवा पुरवठा केंद्र, पर्यटनासाठीचे हब, सर्वोत्कृष्ट दर्जाची शिक्षण व आरोग्य व्यवस्था, यासाठीचे केंद्र बनण्याची रायगडची क्षमता आहे. ही क्षमता विकसित करण्याची आवश्यकता आहे. दूरदृष्टी धोरणांचा पाठपुरावा करण्याचा माझा तुम्हाला शब्द आहे.” 

आपल्या मतदारसंघात पुढील पाच वर्षात अमुलाग्र बदल दिसेल, असे आश्वासन देणाऱ्या तटकरेंनी खरंच आमुलाग्र बदल केला का याचे उत्तर तटकरेंनीच जाहीर केलेल्या संकल्प पत्राचे वाचन केल्यानंतर दिसून येईल. तटकरे यांनी महाडमध्ये जनतेच्या सुविधेसाठी खासदारांचे अद्ययावत कार्यालय असेल असे जाहीर केले होते. मात्र दुसरी निवडणूक आली तरी खासदारांचे कार्यालय महाडमध्ये झाले नाही आणि खासदारांच्या भेटीसाठी नागरिकांना सुतारवाडीच्या फेऱ्या माराव्या लागल्या. अशी अनेक वचने तटकरे यांनी महाडकरांना दिली होती. 

महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अभियांत्रिकी उद्योग व्यवसाय आणून या औद्योगिक क्षेत्राला लागलेला रासायनिक प्रकल्पांचा डाग पुसून टाकण्याची भाषा देखील तटकरे यांनी केली होती. महाडजवळ असलेल्या वीर रेल्वे स्थानकाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी देखील अनेकदा तटकरे यांच्याकडे करण्यात आली. याची पूर्तता करण्यासाठी तटकरे यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत. 

महाडजवळ असलेल्या लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात संपूर्ण देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी या ठिकाणी आजही अनेक पद रिक्त आहेत. या ठिकाणी शेकडो एकर जमीन पडीक असल्याने अनेक वैविध्यपूर्ण कोर्स येणे आवश्यक होते, मात्र याबाबत देखील त्यांनी कधीही लक्ष दिलेले नाही.

खासदार सुनील तटकरे यांच्या जाहीरनाम्यातल्या ठळक गोष्टी पुढील प्रमाणे

(1) मुंबई – गोवा चौपदरी महामार्गाचे काम  प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल,

(2) आपला कोकण हा मुंबईला लागून असल्यामुळे उद्योग विस्तारासाठी मोठा वाव, या दृष्टीने मास्टर प्लॅन आखण्यात येईल,

(3) मुंबईतील व्यवसायाचे सेवा पुरवठा केंद्र म्हणून रायगड विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहू,

(4) रखडलेला सागरी महामार्ग पूर्ण करून त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा आणि त्यास बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे नाव देण्याची मागणी केलेली आहे,

(5) आपल्या कोकण भागासाठी स्वतंत्र प्रदूषण विरहित उद्योग धोरण आखण्याचा आग्रह धरण्यात येईल,

(6) कोकणातील गावांमध्ये पोहोचण्यासाठी पुलाचे महत्व अनन्य साधारण आहे. रायगड मतदार संघातील अपूर्ण राहिलेले आणि नव्याने आवश्यक असे सर्व पूल बांधण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतला जाईल,

(7) कोकणामध्ये आंबा, काजू प्रक्रिया उद्योग क्लस्टर स्थापन करण्याचा आग्रह धरणार,

(8)  रायगड विकास प्राधिकरणामार्फत रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी अद्ययावत, सुरक्षित आणि गतिमान तंत्रज्ञानाचा वापर करणारे रोप वे वापरण्यात येतील,

(9)  मिनी महाबळेश्वर अशी ख्याती असलेल्या दापोलीत चांगल्या प्रतीचे रस्ते विकास करण्याला प्राधान्य राहील व पर्यटन वृद्धीसाठी  सर्वकश प्रयत्न राहील,

(10)  कोकणातील पर्यटन विकास हा पर्यावरण पूरक असेल यावर कटाक्ष राहील,

(11) प्रत्येक सरकारी शाळेत डिजिटल स्मार्ट क्लासरूम स्थापन करण्यात येतील,

(12) लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अभ्यासासाठी स्थानिक पातळीवर लोकसेवा आयोग अभ्यास केंद्र उभारण्यावर तसेच मरीन इंजीनियरिंग व नौदल अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण वर्ग चालवले जातील,

(13) रायगडमधील सर्व नगरपरिषदांमध्ये मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारले जावेत यासाठी उद्योजकांना सहकार्याचे आवाहन करणार,

(14) जहाज बांधणी, जहाज जोडणी यासाठीचे प्रशिक्षित मनुष्यबळ कोकणातच उपलब्ध होण्यासाठी युवकांना प्रशिक्षण देण्याचे काम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हाती घेतले जाईल,

(15) किनारपट्टी नजीक वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे समुद्राच्या लाटांच्या माऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठीचा किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा,

(16) पर्यटनाला चालना देऊन रोजगार निर्मितीवर भर देण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येईल, दळणवळणाच्या सुविधा भक्कम करणे वॉटर स्पोर्ट, साहसी खेळांच्या सुविधा विकसित करण्यावर आणि घरगुती निवास व्यवस्थेला चालना देण्यावर भर दिला जाईल

(17) रोहा व दापोली येथे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात येईल

(18) रायगड जिल्ह्यात बहुजन समाजाच्या बेधखल कुळांचे प्रश्न जातीचे दाखले इत्यादी समस्या प्राधान्याने सोडविणार.

याच बरोबर रायगडमधील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्यावरण समृद्ध गावासाठीचे निकष पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल खासदार निधीचा बहुतांश वापर यासाठी केला जाईल,. रायगड लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आणि गावाचा विकास आराखडा तयार करून विकास कामे हाती घेतली जातील, हरित, स्वच्छ व तंत्रज्ञान युक्त रायगड हे माझे उद्दिष्ट आहे. तसेच रायगडमधील सर्व गावे ऑप्टिकल फायबरने जोडली जातील व जागतिक तापमान वाढीच्या दुष्परिणामांवर नियंत्रण ठेवणे तसेच सर्व तालुक्यांच्या ठिकाणी युथ होस्टेलची उभारणी यासाठी खासदार निधीचा बहुतांश वापर केला जाईल व मुंबई ते अलिबाग या नवीन उपनगरी रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करणार, अशी आश्वासने तटकरे यांनी जनतेला दिली होती. त्यापैकी किती आश्वासनांची पूर्तता मागील पाच वर्षात तटकरे यांच्याकडून करण्यात आली? का असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here