X: @maharashtracity

महाड: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रायगड लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा पारा आधीच 43 ते 45 डिग्री तापमानापर्यंत पोहोचला असल्याने मतदान करून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

पूर्वीच्या कुलाबा या मतदारसंघात 1989 च्या लोकसभा निवडणुकीत ६६.२ टक्के मतदान झाले होते, त्यानंतरच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची टक्केवारी यापेक्षा कमी असल्याने यंदाच्या निवडणुकीत 1989 ची पुनरावृत्ती होणार का असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांना पडला आहे.

सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा,  रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 11 लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होत आहे.  या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वाढत्या तापमानाने हाहाकार माजविला आहे. त्यातच पाणीटंचाईची ही तीव्रता मोठ्या प्रमाणावर आहे. राज्यात उष्णतेचा पारा 43 ते 45 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणावर सर्वत्र जाणवत आहे. त्यामुळे सकाळी नऊच्या आधीच सर्वसामान्य नागरिक आपली कामे उरकून घरातच बसतात. त्यातच एप्रिल महिन्यापेक्षा मे महिना हा तीव्र उष्णतेचा असल्याने या काळात उष्णतेच्या तीव्रतेवर  मतदानाची टक्केवारी अवलंबून असेल.

मतदानची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वच पक्ष मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान करण्यासाठी थंड पाण्याच्या बाटल्यांबरोबरच शीतपेय व आईस्क्रीम यासोबत वातानुकूलित गाडीतून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघात सन 1977 मध्ये 61.68% मतदान झाले होते. त्यानंतर 1980 मध्ये 63.5 %, 1984 मध्ये 64.43 %,  1989 मध्ये 66.2 % ,1991 मध्ये 51.93 %, 1996 मध्ये 57.68 %, 1998 मध्ये 57.79 %, 2004 मध्ये 61.32 %, २००९ मध्ये 56.27 %, 2014 मध्ये 64.47 % तर 2019 च्या निवडणुकीत 61.81%  मतदानाची टक्केवारी नोंदवण्यात आली होती.

आतापर्यंतच्या मतदान टक्केवारीच्या नोंदीनुसार 1989 मध्ये झालेल्या 66.2% टक्केवारीचा विक्रम कायम असल्याने याची पुनरावृत्ती २०२४ मध्ये होणार का? असा सवाल सर्वच राजकीय पक्षांना पडला आहे. उष्णतेची तीव्रता लक्षात घेता साधारणपणे 62 % पेक्षा जास्त मतदान होणार नाही, असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here