X : @Rav2Sachin

मुंबई : मुंबई अग्निशमन दलातर्फे आग विझविण्याचे काम केले जात असेल तरी सद्या घटनास्थळी फायर इंजिनलाच आग लागण्याच्या घटना घडत आहे. या गंभीर घटनेची दखल घेत यासंबंधी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश उपायुक्त प्रशांत गायकवाड यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

अलिकडेच वडाळा फायर स्टेशनचे फायर इंजिन MP – ३३ ही गाडी भायखळा वर्कशॉप येथून वडाळा आरटीओ येथे पासिंग करायला जात असताना पूर्व द्रुतगती मार्गावर अचानक पेट घेतला होता. त्यापाठोपाठ सांताक्रुझ स्मशानभूमीमध्ये आग लागल्याची घटना घडली. घटनास्थळी अंधेरी फायर स्टेशनमधील फायर इंजिन आग विझवण्यासाठी रवाना झाली. स्मशानभूमीच्या लाकडांना आग लागली होती. आग विझवत असताना फायर इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. तोवर अग्निशमन जवानांनी आगीवर थोडे नियंत्रण मिळवले होते. पण फायर इंजिनमधून धूर येत असल्याने जवानांनी आग विझवणे बंद केले. तितक्यात फायर इंजिनमध्ये एक स्फोट झाला आणि आग लागली. सुदैवाने वांद्रे फायर स्टेशनची फायर इंजिन घटनास्थळी होती. या फायर इंजिनने आग विझविली तसेच स्मशान भूमीच्या लाकडांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. दोन्ही दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या दोन्ही घटनेची गंभीर घेत शुक्रवारी उपायुक्त प्रशांत गायकवाड यांनी आपल्या दालनात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. बैठकीत उपायुक्त गायकवाड यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना फायर इंजिनला आग का लागत आहे, याविषयी विचारणा करत या घटनेची गंभीर दखल घेऊन यासंबंधी चौकशी करुन अहवाल सादर करण्यास सांगितले. 

अग्निशमन दलाचे काम हे आग विझविण्याचे आहे. पण आग विझविणाऱ्या फायर इंजिनलाच आग लागण्याच्या घटना घडणे अत्यंत गंभीर आहे. याकरिता योग्य ते पाऊल उचलणे महत्वाचे असल्याने यासंबंधी चौकशी करुन अहवाल सादर करण्यास उपायुक्त गायकवाड यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

दरम्यान, “तांत्रिक ज्ञान नसलेला उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सांभाळतो वाहनांची जबाबदारी!”

https://www.maharashtra.city/breaking-news/mumbai-news-non-technical-deputy-chief-fire-officer-is-in-charge-of-the-vehicles/) या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या बातमी द्वारे अग्निशमन दलाचे वाहने व्यवस्थित न पडताळल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडून मुंबईकरांच्या जीवाला धोका ही होऊ शकतो, ही बाब उजेडात आणली होती. ही बाब आता खरी ठरु लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here