X: @maharashtracity

महाड: रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाखालून वाळूच्या अनधिकृत बार्जच्या वाहतुकीमुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुलाखालून अनधिकृत बार्जची वाहतूक बंद करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे. असे असतानाही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व महसूल खात्याच्या आशीर्वादामुळे ही वाहतूक अशीच सुरू आहे.  आंबेत पुलाची स्थिती धोकादायक  झाली असून हा पूल कोसळण्याची शक्यता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शौकत ईसाने यांनी राज्य सरकारला याबाबत लेखी पत्र पाठवून अवगत केले असून या पुलाखालून अनधिकृत बार्जची  वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.

रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणारा आंबेत पूल तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या कारकिर्दीत झाला होता. मात्र या पुलाखालून अनधिकृतरित्या वाळूच्या बार्जेसमधून वाहतूक चालू असताना या पुलाच्या पाच नंबरच्या पिलरला धक्का लागून पुलाचा काही भाग कमकुवत झाल्याने मागील अडीच वर्ष या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती.

आंबेत पुलाखालून अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या बार्जेसची वाहतूक बंद करा – सामाजिक कार्यकर्ते शौकत ईसाने यांची मागणी

या पुलाच्या डागडुजीवर सार्वजनिक बांधकाम खात्याने तब्बल 22 कोटी रुपये खर्च केले. त्या अडीच वर्षाच्या काळात दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांची सोय व्हावी व हलक्या वाहनांसह मोठ्या वाहनांना दोन्ही जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत जाण्याची सोय व्हावी, यासाठी रोरो सेवेमार्फत आंबेत खाडीतून वाहतूक चालू होती. या वाहतुकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रोरोसेवेधारकाला तब्बल 80 लाख रुपये दर महिन्याला अदा केले.

पुलाच्या दुरुस्तीवर आणि रोरो सेवेवर करण्यात आलेला खर्च पाहता या ठिकाणी नवीन पूल बांधून झाला असता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने या कुठल्याही खर्चाचा अंदाज न घेता जुन्या पुलाची डागडुजी केली. मात्र त्यानंतर पुलाखालून रेतीने भरलेले अवजड बार्जची वाहतूक खुलेआमपणे चालू ठेवण्यास महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड कारणीभूत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शौकत ईशाने यांचे म्हणणे आहे.

वाळूच्या अवजड बार्जेसच्या वाहतुकीमुळे हा पूल कोणत्याही क्षणी बार्जेसच्या धक्क्यामुळे पडल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहील? असा प्रश्न शौकत ईशाने यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे, महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांच्यासह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांच्याकडे तसेच रायगड जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे. मात्र या आंबेत पुलाच्या नदीपात्रातून दोन हजार टन ब्रास भरलेले बार्जेस अनधिकृतरित्या चालू असल्याने या पुलाला या बार्जेसच्या वाहतुकीमुळे धोका निर्माण होऊ शकतो.

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांनी महाडचे प्रांत अधिकारी ज्ञानोबा बानापुरे महाडच्या प्रांताधिकार्‍यांना याबाबत पत्रव्यवहार केला आहे. या पुलाखालून वाहतूक बंद करण्याची मागणी माणगाव सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांनी देखील केली आहे. याबाबतचे पत्र महाडच्या प्रांताधिकार्‍यांना देऊन देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने आंबेत पुलाची स्थिती धोकादायक झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here