महाड: रायगड लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार, माजी मंत्री अनंत गीते यांच्या प्रचारार्थ महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये सुषमा अंधारे आणि सुभान अली शेख यांनी नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर तोंडसुख घेतले. ज्या तटकरेंना शरद पवार यांनी मोठे केले आणि ज्या भरत गोगावले यांना बाळासाहेब ठाकरे यांनी सन्मान दिला, अशा तटकरे आणि गोगावले यांनी गद्दारी केली, हीच गद्दारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत देखील होऊ शकते अशी शक्यता त्यांनी वर्तवली

अनंत गीते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपिठावर शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगुणे, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, माजी नगराध्यक्ष संदीप जाधव, माजी विरोधी पक्ष नेते चेतन उर्फ बंटी पोटफोडे, दक्षिण रायगड जिल्हा शिवसेना प्रवक्ते धनंजय देशमुख, हनुमंत नाना जगताप, उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित मोरे, तालुकाप्रमुख आशिष पळसकर, दक्षिण रायगड वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे, राजेंद्र कोरपे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्वांनीच तटकरे आणि गोगावले या दोघांच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका केली. ज्या पद्धतीने शरद पवार यांना सुनील तटकरे यांनी दगा दिला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी भरत गोगावले यांनी गद्दारी केली, त्याप्रमाणे हे दोघे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी गद्दारी करणार नाहीत का? याची काय गॅरंटी असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

आपल्या भाषणामध्ये सुभान अली शेख यांनी तटकरेंच्या रक्तात गद्दारी आहे, अशी टीका करत तटकरे हे अजित पवार यांना देखील दगा देतील, असा संशय व्यक्त केला. गद्दारी करणाऱ्यांना रायगड कदापी माफ करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपने मराठी अस्मिता जपणारे पक्ष फोडले आहेत. गोगावले यांना सगळ्यात जास्त त्रास सुनील तटकरे यांनी दिला आहे. गोगावले यांच्या मंत्रीपदामध्ये मोठा अडथळा आणणारे हेच सुनील तटकरे आहेत, तरीही त्याच तटकरेंच्या प्रचाराला गोगावले जिवाचं रान करत आहेत. मंत्रिपद देऊ दिलं नाही. कुकर्म लपवण्यासाठी तटकरे भाजपसोबत गेले असा आरोप देखील सुभान अली यांनी केला.

तर सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टिकेची झोड उठवली. वातावरण फिरलय आणि जनतेनेच ठरवले आहे, हे पहिल्या दोन टप्प्यात दिसून आले आहे. यामुळेच भाजपवाल्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. भरत गोगावले हा आमचा भाऊ आहे आणि त्यांचा सुपुत्र आमचा भाचा आहे, असे सांगून सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपा हिंदूची सावली आहे, मग मराठी माणसावर लाठीमार झाली ते हिंदू नव्हते का? असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. मोदींना विकासावर बोलता येत नाहीत त्यामुळे त्यांनी जातीच्या भिंती उभ्या केल्या आहेत. धार्मिक चिथावणीखोर वक्तव्य करून गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या जाती-जाती तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने सुरू केली आहे.

सुषमा अंधारे यांनी देशातील भाजपच्या भक्तांना प्रश्न करून आम्ही विचारत असलेल्या फक्त नऊ प्रश्नांची उत्तरे त्यांनी देण्याचे आव्हान दिले. एकतरी स्मार्ट सिटी दाखवा, खासदार दत्तक आदर्श गाव योजना, नऊ जिल्हे सांगा ज्यात शंभर टक्के शौचालये आहे, नऊ राज्य सांगा ज्या राज्यात सलग शंभर किलोमीटरचा रस्ता तयार झाला आहे. जन धन खाते सांगा ज्यामध्ये पंधरा लाख जमा झालेत. नऊ राज्य सांगा ज्यात नव्याने वीज प्रकल्प उभे राहिलेत, नऊ मंत्री सांगा ज्यांची मुले सरकारी शाळेत शिकतात. भाजप नेते सांगा ज्यांच्या घरी ई डी ची धाड पडली. असे नऊ जिल्हे जिल्हे सांगा जिथे एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. सलग टप्पा दाखवा ज्यात गंगा स्वच्छ झाली आहे, नऊ जिल्हे सांगा शंभर टक्के सिंचन प्रकल्प पूर्ण झालेत. अशा नऊ प्रश्नांची उत्तरे भाजपच्या भक्तांनी द्यावीत.

रायगडच्या सुनील तटकरे यांच्या घरात सगळेच सत्तेत, मग रायगडकरानी काय करायचं असा प्रश्न उपस्थित केला. महापालिकेच्या निवडणुकीला पण मोदींना यावं लागत यातच त्यांचा पराभव दिसून येत आहे. फॅशनच्या दुनियेत गॅरंटी की बात नहीं होती. एकदा विकलेला माल परत घेतला जात नाही असे व्यापारी लिहून ठेवतो मग विकलेला आमदार, खासदार आम्ही का स्वीकारावा. संविधान बदलण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन केले जात आहे पण आम्हाला वन नेशन वन एज्युकेशन पाहिजे, पक्ष आणि चिन्हं चोरणारी टोळी आम्हाला नको. अशा खरपूस शब्दात. त्यांनी गोगावले व तटकरे यांचा समाचार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here