@maharashtracity

धुळे: ’एक गाव, एक कार्यकर्ता- एक तिरंगा’ अभियानाद्वारे धुळे (Dhule) जिल्ह्यातील साडेसात हजार कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प सोडल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. शहरमंत्री भावेश भदाणे, वैष्णवी मराठे, अभियान प्रमुख निखिल तायडे यावेळी उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे देशासह राज्यात ’एक गाव- एक कार्यकर्ता- एक तिरंगा’ हे अभियान १५ ऑगस्टला स्वांतत्र्य दिनानिमित्त राबविण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात चारही तालुक्यांत हे अभियान राबविले जाणार आहे.

धुळे शहरात दोन हजार ठिकाणी माजी सैनिक, डॉक्टर, कोरोनायोद्ध्यांच्या हस्ते त्या-त्या भागात सार्वजनिक ध्वजवंदन होईल. जिल्ह्यातील चार तालुक्यांत ६५ ठिकाणी सार्वजनिक ध्वजवंदन व १४२ गावांतील साडेसात हजार कुटुंबात भारतमाता प्रतिमापूजन व ’घर घर तिरंगा मन मन तिरंगा’ हे ब्रीद घेऊन घरावर राष्ट्रध्वज लावणार आहेत.

तालुका, शहर व गावासाठी अभियानप्रमुख म्हणून कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली आहे. या अभियानात जिल्हाभरात एकूण २८७ कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून गाव, वस्ती, पाडा, कॉलनीतील घरोघरी प्रत्येक नागरिकापर्यंत पोचून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रमांत विद्यार्थी परिषद नागरिकांना सहभागी करून घेणार आहे.

आगामी वर्षभर विद्यार्थी परिषद देशभरात विविध कार्यक्रम घेणार आहे. जिल्ह्यात विविध ७५ कार्यक्रमांची योजना वर्षभरासाठी केली असल्याची माहिती अभियानप्रमुख निखिल तायडे यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, महिला बचतगट, सामाजिक संस्था व नागरिकांनी या अभियानांतर्गत सार्वजनिक ध्वजवंदन व भारतमाता पूजनाचे कार्यक्रम घ्यावेत, असे आवाहन अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here