Twitter : @maharashtracity

मुंबई

सध्या पाऊस गेला असून वातावरणात धुरक पसरले आहे. शिवाय वातावरणातील आर्द्रतेमुळे प्रदुषकेही वातावरणाच्या बाहेर न जाता हवेत फिरत राहत आहेत. त्यामुळे सामान्य मुंबईकर श्वसनासारख्या आजारांनी त्रस्त आहे. सध्या मुंबईतील हवा राज्याच्या राजकारणासारखी प्रदूषित झाली असल्याची टीका करत मुंबई प्रदेश काँग्रेसने या प्रदूषणाशी दोन हात करण्याचे सुचवले आहे. राज्य सरकारने किमान लोकांच्या हितासाठी तरी विरोधी पक्षांच्या मताची दखल घ्यावी, असे सांगत महाविकास आघाडी सरकारने तयार केलेल्या मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लानची (Mumbai Climate Action Plan) आठवण करुन देत तो राबविण्याची मागणीही मुंबई काँग्रेसने केली आहे.  

यावर बोलताना मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikawad) यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा (Air Quality Index in Delhi) स्तर सर्वात खराब होता. मात्र मुंबईने दिल्लीलाही मागे टाकलं आहे. मुंबईतील हवा गेल्या काही दिवसांपासून अत्यंत खराब आहे. दिवसभर शहरात धुरकं असल्याने उष्माही वाढला आहे. या सर्वाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होत असून श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ होऊ लागली असल्याचे गायकवाड म्हणाल्या. शहरात सुरू असलेली बेसुमार बांधकामे, प्रकल्पांसाठीची खोदकामे आणि इतर विकासकामांमुळे शहरभर धुळीचं साम्राज्य पसरलं आहे. त्यातच अनेक प्रकल्प रखडल्याने वाहतूक कोंडीही वाढली असून त्यामुळेही प्रदूषणात वाढ झाली आहे.

निरी (NEERI) आणि आयआयटीबीच्या (IIT-B) संशोधनानुसार, मुंबईच्या हवेतील ७१ टक्केपेक्षा जास्त प्रदूषणासाठी रस्ते किंवा बांधकामातून उडणारी धूळ कारणीभूत आहे. उर्वरित प्रदूषण कारखाने, वीजनिर्मती केंद्र, विमानतळ आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याद्वारे निर्माण होत आहे, या गोष्टीकडेही मुंबई प्रदेश काँग्रेसने लक्ष वेधलं. अशा वेळी सरकार आणि महापालिका यांच्याकडून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, पालिकेतील कचरा व्यवस्थापनासंबंधीची अनेक पदं आजही रिक्त आहेत. ती न भरल्याने कचऱ्याची समस्या पुढील काळात आणखी बिकट होणार आहे.

हे सरकार इतर ’अर्थपूर्ण’ कामांमध्ये व्यग्र असून कंत्राटदारांचे खिसे भरण्यापासून त्यांना वेळ मिळत नाही, अशी टीकाही वर्षा गायकवाड यांनी केली. मविआ सरकार (MVA government) असताना तयार केलेला आणि नंतर शिंदे सरकारने राजकारणापोटी बासनात गुंडाळलेला मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लान तातडीने लागू करावा अशी मागणी केली आहे. या आराखड्यानुसार बांधकामांच्या तासांचं नियोजन करणं, या बांधकामांच्या ठिकाणी हवा व ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची अमलबजावणी करणं, विविध भागांमध्ये इको पार्क्सची निर्मिती आणि डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट, अशा उपाययोजना करता येतील, असा तोडगाही मुंबई प्रदेश काँग्रेसने सुचवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here