Twitter : @milindmane70

महाड

महाडमध्ये कारवाईच्या नावाखाली बंद केलेला मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरु झाला आहे. पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठबळावर ऐतोहासिक शहरात खुलेआम मटका व्यवसाय सुरु असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ज्या शहरात मटका दिसून येईल त्या शहरातील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, या शासनाच्या आदेशाचे पालन झाले पाहिजे, अशी मागणी देखील शहरवासियांकडून होत आहे. महाडमधील बेकायदेशीर धंदे बंद न केल्यास फेसबुक लाईव्ह करून बेकायदेशीर धंद्याचे पितळ उघडे पाडण्याचा इशारा महाड मनसेचे (Maharashtra Navnirman Sena city President Pankaj Umasare) शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी महाड पोलिसांना दिला आहे.

ऐतिहासिक महाड शहर हे जाणते राजे छ. शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, या महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. राजकीय, सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील दिग्गज या महाड क्रांतीभूमीने दिले आहेत. महाडमध्ये वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव देखील प्रसिद्ध आहे. तर ऐतिहासिक चवदारतळे येथे प्रतिवर्षी लाखो भीम अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. प्रतिवर्षी लाखो पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. अशा ऐतिहासिक शहरात गेली अनेक वर्ष खुलेआम मटका, ऑनलाईन लॉटरी, आणि सोशल क्लबच्या नावाखाली पत्त्याचे डाव रंगत आहेत. याबाबत सातत्याने मटका हे बेकायदेशीर व्यवसाय बंद व्हावेत, म्हणून मागणी होत असली तरी पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

शहरातील गल्लीत दिसणारी मटका दुकाने आता थेट रस्त्यावर टपरी टाकून खुलेआम सुरु करण्यात आली आहेत. महाड शहरात नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांकडून तात्पुरती धमक दाखवत हे व्यवसाय काही दिवसांकरिता बंद ठेवले जातात, मात्र, अवघ्या काही दिवसात हे व्यवसाय पुन्हा सुरु केले जातात. त्यातच अनेकजण हे राजकीय पक्षांशी संबंधित असल्याने त्यांना राजकीय पाठबळदेखील लाभत आहे.

राजकीय नेत्यांनी बंद म्हटले कि हे व्यवसाय बंद आणि सुरु करा म्हटले कि सुरु, अशी परिस्थिती महाडमध्ये असून शहरातील मुख्य बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, सुकट गल्ली व बाजारपेठेमध्ये नागरी वस्तीजवळ, शाळेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर धंद्यांनी उच्छाद मांडला आहे.

महाड शहरात सध्या गल्लोगली मटका आणि ऑनलाईन लॉटरीची दुकाने सुरु झाली आहेत. याबाबत गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, पोलीस प्रशासनाने याकडे जाणिवपूर्वक कानाडोळा केला आहे. शहरातील छ. शिवाजी चौक परिसराला देखील या व्यवसायाने वेढा दिला आहे. त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख रस्ते, नातेखिंड, महामार्ग याठिकाणी टपऱ्यांमधून मटका दुकाने खुलेआम सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातील जनता, आदिवासी, तरुण मुले झटपट पैसा मिळवण्याच्या हेतूने मटका आणि ऑनलाईन लॉटरीकडे वळत आहेत. यातून व्यसनाधीनता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोटाची भूक भाग्वण्यासाठी धडपड करत असलेले आदिवासी या मटका दुकानांचे बळी ठरत आहेत. दिवसभर मेहनत करून कमावणारे आपले पैसे मटक्यावर उधळत असल्याने अनेकांचे संसार धोक्यात आले आहेत. 

महाड शहर पोलीस प्रशासनाच्या पाठबळाने हे व्यवसाय सुरु असल्याचे व्यवसायिकांचे म्हणणे आहे. यामुळे आमचे कोणी कांही बिघडवू शकत नाही, अशी भाषा त्यांच्याकडून केली जात आहे.

महाडमध्ये बहुतांश मटका व्यवसाय शैक्षणिक संकुलांच्या जवळपास आहेत. छ. शिवाजी चौक परिसरात देखील अनधिकृतपणे झोपड्या उभारून तर पालिकेच्या गाळ्यांचा वापर मटका व्यवसायासाठी केला जात आहे. या व्यवसायांना काही बड्या राजकारणी लोकांचा देखील पाठींबा असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पालिका आणि पोलीस प्रशासन कारवाई करण्यास हात आखडता घेत आहेत. हातावर पोट असलेले मजूर, कामगार, आदिवासी या मटका आणि ऑनलाईन लॉटरीचे बळी पडत आहेत. 

महाड तालुक्यातील गोरगरीब मजूर दिवसभर कमावलेले पैसे मटक्यावर घालवत आहेत. यामुळे अनेकजण आपले संसारिक सुख गमावून बसत आहेत. त्यामुळे ऐतिहासिक महाड नगरीत हे अनधिकृत व्यवसाय हद्दपार होण्यासाठी पोलीस प्रशासनाने याबाबत कडक कारवाई करणे आवश्यक आहे.

बिरवाडीमध्ये देखील मटका व्यवसाय तेजीत

महाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कंपन्यांमधून असलेले कामगार, चालक, मजूर हे दिवसा मेहनत करून कमावतात आणि संध्याकाळी ऑनलाईन लॉटरी, मटक्यावर खर्च करतात. पैसे मिळाले नाही तर त्यांची पावले चोरी करण्याकडे वळतात. बिरवाडीमध्ये जवळपास आठ ते दहा मटका दुकाने असल्याची माहिती स्थानिक नागरिकाने दिली. लोकसंख्या वाढत असली तरी बाजारपेठ छोटी असल्याने हि दुकाने सहज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नजरेत पडतात. बिरवाडीमध्ये देखील पोलीस कारवाई कुचकामी ठरत असल्याने हे मटका व्यवसायिक आपले कोणी बिघडवू शकत नाहीत या अविर्भावात आहेत.

विद्यार्थी विचारतात हे दुकान कसले आहे

बिरवाडी गावात बाजारपेठेतील रस्त्यावर टपऱ्या टाकून मटका व्यवसाय सुरु असल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी देखील आपल्या पालकांना आवर्जून हे दुकान कसले आहे, असा प्रश्न करतात. यामुळे भविष्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पावलेदेखील या अवैध मटका व्यवसायाकडे वळण्याची भीती व्यक्त होत आहे.

महाड शहरात चालू असणारे अवैध मटका सेंटर ऐतिहासिक महाड शहराला बदनाम करण्याचे काम करीत असल्याने ते तातडीने बंद न केल्यास फेसबुक लाईव्ह करून या बेकायदेशीर धंद्यांचे पितळ उघडे पाडण्याचे काम महाड शहर मनसे कडून केले जाणार असल्याचे लेखी पत्र महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी महाड पोलीस ठाण्याला दिले आहे. मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महाड शहर पोलीस नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here