Twitter : @maharashtracity

मुंबई

नवी मुंबईतील खारघर येथे एप्रिल महिन्यात आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात दुर्घटनेत  14 भाविक बळी पडले.  त्यासाठी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानसभेत केला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रचंड गदारोळात उत्तर देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने  घोषणाबाजी करीत विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.
प्रश्नोत्तराच्या तासात खारघर दुर्घटनेवर पहिलाच प्रश्न होता. मंत्री मुनगंटीवार उत्तर देऊ लागले. उष्णतामान विचारात घेऊन व्यवस्था चोख होती. मात्र, नंतर उष्णता वाढल्याने हे घडले. या प्रकरणी विरोधीपक्ष अतिशय घाणेरडे राजकारण करीत आहेत. त्यांची सत्ताकांक्षा यातून दिसते, असा आरोप मुनगंटीवार यांनी उत्तर देताना केला.  

या आरोपमुळे संतप्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सदस्य जयंत पाटील, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांनी जोरदार हरकत घेतली. विभागाचे मंत्री मूळ प्रश्नांची योग्य उत्तरे देत नाहीत. राजकीय भाषण करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

कॉंग्रेस सदस्य अशोक चव्हाण म्हणाले, या प्रकरणी गठीत चौकशी आयोगाला तीन महिने झाले. आता आणखी मुदतवाढ कशाला? सरकार हे प्रकरण गुंडाळू इच्छिते काय? असा सवाल त्यांनी केला. तर बाळासाहेब थोरात यांचा आक्षेप मंत्री थेट उत्तरे न देता मागच्या काळात कोणते अपघात झाले, त्यांच्या चौकशी आयोगाना कशी मुदतवाढ दिली, हे उकरून काढण्याला होता. तेथील आयोजन कुणाच्या सोयीसाठी भर उन्हात करण्यात आले? असा संतप्त सवाल त्यांनी केला. तेव्हा विरोधी सदस्य घोषणाबाजी करू लागले. तरी मुनगंटीवार आपले उत्तर देत होते. मात्र गदारोळात विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here