@maharashtracity

घरोघरी जाऊन गरोदर महिलांचे समुपदेशन करणार

मुंबई: मुंबईत १.६ लाख गरोदर महिला असून यातील ८८७ जणींना दोन डोस पूर्ण झाले असल्याची आकडेवारी सांगते. (887 pregnant women in Mumbai administered second jab of corona vaccine) लसीमुळे गर्भावर परिणाम होईल अशी भीती महिलांना वाटत असल्याने लस टोचून घेण्यास गरोदर महिला तयार नसल्याचे समोर येत आहे.

कोविड लसीकरणावर घरोघरी जाऊन समुपदेशन करणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. यासाठी आशा कार्यकर्तीचे मदत घेण्यात येणार आहे. (BMC to create awareness among pregnant women)

मुंबई महानगर पालिकेने (BMC) दिनांक १५ जुलैपासून गरोदर महिलांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. तरीही अद्याप लसीकरण (vaccination) उद्दीष्ट पूर्ण केले नसल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे. २ हजार ६८४ गरोदर महिलांनी एक लस टोचून घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ही भविष्यात चिंतेची बाब ठरु शकते असे तज्ज्ञ भिती व्यक्त करत आहेत.

आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार गरोदर महिलांना समुपदेशन आणि मार्गदर्शन करुन देखील ९८ टक्के गरोदर महिला लस घेण्यास नकार देत असल्याचे सांगण्यात आले. लसीबाबत भिती आणि अज्ञान यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले.

गरोदर महिलांच्या लसीरकणाची घोषणा केल्यापासून पहिल्या तीन महिन्यात लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद दिसून येत नव्हता. पहिल्या दिवसात १.६ टक्के महिलांनी लस टोचून घेतली होती. गरोदर महिलांमधील लसीकरणावर जागरुकता करण्यावर पालिका प्रशासन भर देत आहे. त्यासाठी बॅनर पोस्टर्स वॉर्डात झळकविण्यात आली आहेत.

मात्र लसीबाबत अद्याप साशंकता दिसून येत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यासाठी प्रत्येक पालिका रुग्णालये, दवाखाने यांना गरोदर महिलांना समुपदेशन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

स्त्रीरोग विभाग प्रमुख गरोदर महिलांना आरोग्य स्वच्छता आणि बाळाच्या आरोग्य सुदृढतेसाठी सतत लसीकरणाचे महत्व सांगत आहेत. गरोदर महिला गर्भातील बाळाच्या आरोग्याबाबत चिंतेत असल्याने बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने लसीस टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी देखील आरोग्य विभाग गरोदर महिलांमधील लसीकरणाची टक्केवारी वाढवण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे सांगितले. दरम्यान पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, पालिका आता घरोघरी जाऊन गरोदर महिलांमध्ये लसीकरणाबाबत जागरुकता मोहिम राबविणार आहे. यामुळे सर्व गरोदर महिलांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here