Twitter : @NalavadeAnant

रायगड
मुंबई – गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यातील ८४ किलोमीटरचा रस्ता पूर्ण क्षमतेने तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व मशिनरीचा वापर होत आहे. त्यामुळे सिंगल लेनवरील काम पूर्ण होत आहे. त्यामुळे येत्या १० सप्टेंबरपासून ही लेन वाहतूकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

रविंद्र चव्हाण यांनी मुंबई ते गोवा या महामार्गाच्या कामाची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी पनवेल ते वाकण फाटा, नागोठाणे पर्यंतच्या कामाची पाहणी केली. पहिल्या टप्प्यातील पळस्पे फाटा तसेच जिते तर कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील पांडापूर येथील व नागोठाणे येथील कामाची पाहणी केली. या रस्ते कामासाठी अत्याधुनिक मशिनरी मागवण्यात आल्या आहेत. त्याची सविस्तर माहिती उपस्थित अधिकार्‍याकडून घेतली.

मंत्री चव्हाण म्हणाले, राष्ट्रीय महामार्गावरील कासूपासून पुढील कामाची गती वाढविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (एनएचएआय) अधिकारी आणि ठेकेदारांना आदेश दिले आहेत. या टप्प्यातील ७ किमी चा रस्ता थोडा किचकट आहे. ही स्थिती पाहून नवीन तंत्राचा वापर केला जात आहे. खोलवर सिमेंट का‌ॅन्क्रीटचा वापर, अवजड वाहतुकीमुळे रस्ता खराब होऊ नये यासाठी रस्ता बनवताना २० टनी रोलरचा वापरही केला जाणार आहे. यासोबतच आधुनिक मशीन उपलब्ध करण्यात आले असून पांडापुर येथे त्यांनी त्याचीही पाहणी केली.

कासूपासून पुढील ७ किमी व नंतर ३.५ किमी अंतरासाठी आर्म टाॅपिग पद्धतीचा वापर होईल. या फेजमध्ये पळस, वाकण फाटा, जिंदाल गेट, कोलाड, इंदापूर या भागात विविध अंतरानुसार कामाची विभागणी केली आहे. तर इंदापूर जवळचा टप्पा पूर्ण करताना १६ किमी अंतर व्हाईट टाॅपिंग तंत्राचा वापर  केला जाईल. यासाठी नियुक्त अधिकारी व यंत्रणेच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला.

महामार्गाची तातडीने कामे होण्यासाठी वाहतुकीचा अडथळा येऊ नये यासाठी पोलीस विभागांचे सहाय्य घेण्याबाबत सूचना दिल्या. याबाबत त्यांनी पोलीस अधिक्षक सोमनाथ घागरे यांच्याशीही चर्चा केली. हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कोकणातील जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणाऱ्या हा महामार्गाची एक लेन गणेशोत्सवपूर्वी वाहतुकीसाठी पूर्ण करण्यात येईल आणि ९ मीटर रुंदीच्या दोन्ही लेन डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार,अशी खात्रीही यावेळी चव्हाण यांनी दिली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई – गोवा महामार्गाचे बहुतांश काम जवळजवळ पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, एनएचएआयचे मुख्य अभियंता संतोष शेलार, प्रकल्प अभियंता यशवंत घोटेकर, कार्यकारी अभियंता निरज चोरे यासह विविध विभागांचे अधिकारीही होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here