@maharashtracity

By अनंत नलावडे

मुंबई: दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एस टी महामंडळाने यंदा राज्यभरात ‘दिवाळी स्पेशल’ १ हजार ४९४ जादा बसेस (Diwali Special ST Buses) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यानच्या कालावधीत या बसेस धावणार असल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (IAS Shekhar Channe) यांनी गुरुवारी येथे दिली.

मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्यामार्फत दि. २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सर्व विभागांना दिलेल्या आदेशानुसार जादा बसेस आरक्षणासाठी (reservation of ST Bus) उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व प्रवाशांनी या जादा बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहनही चन्ने यांनी केले.

दरम्यान, एसटी महामंडळाने ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेतंर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास लागू केला आहे. तर ६५ ते ७५ वर्ष वय दरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात जेष्ठ नागरिकांनीही (senior citizens) या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन चन्ने यांनी केले.

दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवासी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने दरवर्षी प्रमाणे नियमित बस फेऱ्या बरोबरच प्रवासी गर्दी लक्षात घेऊन १ हजार ४९४ जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.

प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या- टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती देतानाच सध्या औरंगाबाद विभागातून ३६८, मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ गाड्या सोडण्यात येतील, असेही चन्ने यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here