uddhav

उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान

@maharashtracity

By अनंत नलावडे

मुंबई: “आज प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावे लागते. मैदानासाठी न्यायालयात जा, उमेदवारीसाठी न्यायालयात जा, अरे हिंमत असेल तर मैदानात या ना. मी तयार आहे. मी आता पूर्ण क्षमतेने मैदानात उतरलोय. समोरासमोर या. होऊन जाऊ दे काय ते, मी लढाईला तयार आहे, असे खुले आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा गटाला दिले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ (NCP leader Chhagan Bhujbal) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी भाजपा (BJP) आणि शिंदे गटाचा (Shinde group) समाचार खरपूस घेतला. शिवसेनेचा जन्मच मुळी लढण्यासाठी झाला असून शिवसेनेला (Shiv Sena) रोज धक्के बसत आहेत. पण आम्ही हिमतीने त्यांना तोंड देतोय, असेही ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांना शुभेच्छा देतानाच जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. चार महिने अजून सत्ता असती तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते, असा उल्लेख विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या भाषणात केला. तोच धागा पकडून ठाकरे म्हणाले खरं तर छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते या आधीच मुख्यमंत्री झाले असते,” असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

“भुजबळ यांनी शिवसेना सोडली तो आमच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता. त्यातून सावरायला खूप वेळ लागला. पण भुजबळांनी बाळासाहेब असतानाच सर्व मतभेद मिटवले ही गोष्ट चांगली केली. शिवसेना सोडताना भुजबळ एकटे गेले. पण महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला सोबत आणले, असे प्रशंसोद्गारही ठाकरे यांनी काढले.

जम्मू- कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हेसुध्दा या सोहळ्याला उपस्थित होते. उद्धव ठाकरे यावेळी फारुख अब्दुल्ला यांनी उद्देशून म्हणाले की, “फारुख अब्दुल्ला आणि बाळासाहेबांची चांगली मैत्री होती. ते आल्या आल्याच मला म्हणाले. अजिबात घाबरू नकोस, वडिलांसारखा लढ.” ही लढाई आम्ही सोडणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “भुजबळांचा इथे वादळ म्हणून उल्लेख झाला. अशी अनेक वादळे शिवसेनेने अंगावर घेतलीत. कारण त्यावेळी अशी अनेक वादळे शिवसेनेसोबत होती. आताच्या वादळातही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससारखी वादळे शिवसेनेसोबत आहेत. वादळे निर्माण करणारे शरद पवार सोबत आहेत, असे म्हणताच प्रचंड टाळ्या आणि घोषणांनी सभागृह दणाणून गेले.

“प्रत्येकाचेच वय वाढत असते. बाळासाहेब नेहमी सांगायचे की माणूस वयाने मोठा होत असतो. पण ज्याक्षणी तो विचारांनी थकतो, तेव्हा वृध्द होतो. छगन भुजबळ असोत, फारुख अब्दुल्ला असोत किंवा शरद पवार (Sharad Pawar), ही तरुण मनाची माणसे आहेत. नुसते मन तरुण असत चालत नाही तर तुमच्या मनात एक जिद्द आणि ईर्षाही असावी लागते,” अशी स्तुतीही ठाकरे यांनी उभय नेत्यांची केली.

राज्यात भाजप नको म्हणून एक नवीन समीकरण आपण महाराष्ट्रात जन्माला घातले- महाविकास आघाडी. हे समिकरण जुळवून दाखविल्यानंतर विरोधकांना पोटशूळ उठला. सरकार पाडले, पण आणखी किती खालच्या पातळीवर जाणार?” असा सवाल विरोधकांना करतानाच ठाकरे यांनी, ही लढाई एकट्या शिवसेनेची नाही तर देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. नुसती निशाणी नाही तर विचारांची धगधगती मशाल घेऊन सज्ज व्हा, असे आवाहन उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांना यावेळी केले.

“याआधी विधानसभेची उंची वेगळीच होती, ते नुसते मजले नव्हते, एफएसआय नव्हता तर वैचारिक एफएसआय अधिक होता. मी स्वत: एक-दोनदा तिथल्या गॅलरीतून केशवराव धोंडगे यांचे भाषण ऐकलेले आहे. विधानसभेत छगन भुजबळ, त्याआधी वामनराव महाडिक हे शिवसेनेचे एकमेव आमदार होते. त्यावेळी वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते. त्यांनी शिवसेनाप्रमुखांना सांगितले, बाळासाहेब (Balasaheb Thackeray) तुम्ही काय माणूस विधानसभेत पाठवलाय, एक माणूस पाठवलाय पण तो बोलायला उभा राहिला की सर्व सभागृह स्तब्ध राहून त्याचे भाषण ऐकत बसते. हल्ली कोण काय बोलते, कोण काय बोलते कशाचा धरबंध कशाला नाही,” असा मार्मिक टोलाही उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाव न घेता लगावला.

असे म्हणतात की नियतीच्या मनात काय असते याची कुणालाच कल्पना नसते. कदाचित तिच्या मनात हेच असेल की आता नेमक्या मर्द लोकांच्या हाती मशाल (Mashal) देण्याची आवश्यकता आहे, असे ठाकरे यांनी सांगताच टाळ्यांच्या गडगडाटाने सभागृह दणाणून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here