@Maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) हे निवृत्त झाल्याने आता त्यांच्या जागेवर राज्य शासनाने आशिष शर्मा (IAS Ashish Sharma) यांनी नियुक्ती केली आहे.
ते यापूर्वी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर गेले होते. त्यांना प्रधान सचिव श्रेणीत पदोन्नती देऊन मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्त करण्यात आले आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शर्मा यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. तसेच, त्यांना आदेशाची प्रत मिळताच त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारावा, असे आदेशात म्हटले आहे.
आशिष शर्मा हे १९९७ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या महानिर्मिती (Mahagenco) कंपनीत व्यवस्थापकीय संचालक (MD) या पदावर काम केले असून त्यांना केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. तेथे त्यांनी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग (DoPT) या विभागात जॉईंट सेक्रेटरी या पदावर काम केले.
मुंबई महापालिकेतील सुरेश काकाणी यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारकडून पुन्हा राज्य सरकारच्या सेवेत बोलावण्यात आले. ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील.