आपदा मित्र व आपदा सखी घडविणार

आपत्कालीन परिस्थितीबाबत सजग व सक्रिय असणे गरजेचे -: अतिरिक्त आयुक्त

जागतिक आपत्ती जोखीम घट दिनानिमित्त प्रशिक्षण कार्यक्रमांचा शुभारंभ

@maharashtracity

मुंबई: मुंबईत आपत्कालीन घटना घडल्यास अग्निशमन दलाची (fire brigade) प्रत्यक्ष मदत घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यामार्फत आवश्यक बचावकार्य करण्यास मदत व्हावी आणि आपत्ती हानीची तीव्रता कमी व्हावी यासाठी स्थानिक नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थी यांची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाला व विद्यार्थ्यांना मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत (disaster management) आपत्कालीन प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षित विद्यार्थी व नागरिकांमधूनच “आपदा मित्र” व “आपदा सखी” घडविण्यात येणार आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDRF) निर्देशांनुसार मुंबई महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांना संभाव्य आपत्तींबाबत सुव्यवस्थापन साधणे सुलभ व्हावे, यादृष्टीने ५ दिवसांचा एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ गुरुवारी महापालिका मुख्यालयात करण्यात आला.

संयुक्त राष्ट्र संघाने (UNO) दरवर्षी १३ ऑक्टोबर रोजी जागतिक आपत्ती जोखीम घट दिन पाळण्याचे निर्देशित केले आहे. या औचित्याच्या निमित्ताने मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या सभागृहात पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर, आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे, संबंधित अधिकारी आणि के. सी. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आपत्कालीन परिस्थितीबाबत सदोदित सजग व सक्रिय असणे गरजेचे -: अतिरिक्त आयुक्त

विविध आपत्तींची संभाव्यता असलेल्या मुंबई शहरात आपण सर्वांनीच आपत्कालीन परिस्थितीबाबत सदोदित सजग व सक्रिय असणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना आपत्कालीन प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच, प्रशिक्षणार्थींनी आपल्या महाविद्यालयात व सोसायटीत जाऊन तेथील किमान १० व्यक्तिंना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण द्यावे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक व्यापक स्तरावर साध्य करण्यासोबतच संभाव्य आपत्तींची जोखीम कमी करण्यास मदत होणार आहे,’ असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

प्रशिक्षणार्थींना आपत्कालीन व्यवस्थापन संच देणार -: महेश नार्वेकर

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून आपत्कालीन प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपयोगी ठरेल अशा उपयोगी वस्तुंचा एक संच दिला जाणार आहे. या संचामध्ये लाईफ जाकेट, हेल्मेट, प्रथमोपचार साहित्य यासारख्या विविध बहुपयोगी वस्तुंचा समावेश आहे, अशी माहिती संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी या निमित्ताने दिली आहे.

संभाव्य आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशिक्षण -: रश्मी लोखंडे

संयुक्त राष्ट्र संघामार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑक्टोबर महिन्याच्या १३ तारखेला जागतिक आपत्ती जोखीम घट दिन पाळला जातो. आपत्तींमधील धोके कमी करण्यासाठी, प्रशासन आणि नागरिक यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस मुख्यत्वाने पाळला जातो. संभाव्य आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्याकरिता सक्षम अशा समुहाची व त्यायोगे राष्ट्राची बांधणी करण्याचा उद्देश यामागे आहे, असे प्रतिपादन आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here