महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस संघटनेचा आरोप

@maharashtracity

मुंबई: एस टी महामंडळाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने चार वर्ष कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाच्या अर्थसंकल्पात तरतुद केली जाईल, असे कबूल केले असताना देखील अवघ्या काही महिन्यातच त्या शिफारशीला हरताळ फासला. आता मात्र तोडून तोडून केलेली मदत म्हणजे ठिगळे लावण्याचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे (Maharashtra ST Employees Congress) सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी गुरुवारी केला.

याबाबत बरगे पुढे म्हणाले की, आश्वासन देऊन काही महिन्यातच अहवालातील शिफारशीला हरताळ फासण्यात आला. ही बाब गंभीर असून सरकारने कर्मचारी तसेच एसटीची फसवणूक केली असल्याचे बरगे यांनी सांगितले. एसटीला (ST Corporation Employees) दर महिन्याला वेतनासाठी ३६० कोटी रुपये लागतात. मात्र, तीन ते चार महिन्यात केवळ १००-१०० कोटी असे ४०० कोटी तर आता तातडीने ३०० कोटी इतकी रक्कम देण्यात आली असल्याचे बरगे यांनी सांगितले.

सन २०२२२-२३ करता अर्थसंकल्पात २४५० कोटी रुपयांची तरतूद केली असताना, त्या पैकी केवळ ७०० कोटी रुपये सरकारने एसटीला दिले आहेत. ही मदत अपुरी आहे. सध्या महामंडळाला २ हजार कोटी रुपयांचे देणं आहे. यातही निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी, फंड, रजा रोखीकरणाचे पैसे, टायर, ऑईल, सुटे भाग हे पुरविणाऱ्या कंपन्यांची उधारी, विविध बसस्थानकांचे नुतनीकरण (modernization of ST Bus depot), आधुनिकीकरण सुरू आहे. त्या कंत्राटधारकांची बिले, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय रक्कमेची प्रतिपुर्ती अशा विविध देण्यांचा समावेश आहे.

या महिन्यांत कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळाले नाही व मनस्ताप झाला व न्यायालयाचा अवमान (contempt of court) देखील झाला असल्याचे श्रीरंग बरगे यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळी (Diwali) तोंडावर आली असल्याने दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना सध्याच्या महागाईचा विचार करून चांगली रक्कम दिवाळी भेट म्हणून दिली पाहिजे, ३४ टक्के महागाई भत्ता व त्याचा फरक दिला पाहिजे. हे सर्व करण्यासाठी एसटीला निधीची आवश्यकता असून अर्थसंकल्पात तरतूद केलेली पूर्ण रक्कम शासनाने एसटीला द्यावी किंवा महामंडळाने मागणी केलेली ७३८.५० कोटी रुपये इतकी रक्कम तरी तात्काळ द्यावी, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here