राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांना पत्र

@maharashtracity

मुंबई: मोठ्या शहरात तरुणी गायब होण्याचे प्रकार वाढत असून काही प्रकरणी तक्रार दाखल केल्यास पुढील पाठपुरावा होत नसल्याच्या कुटुंबियांच्या तक्रारी राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. महिलांच्या संदर्भात गुन्ह्यात त्वरीत कारवाईसाठी विशेष युनिट काम करत असून या यंत्रणांना विविध घटनांमध्ये एसओपी करावी यासाठी राज्य महिला आयोगाकडून (Maharashtra State Women’s Commission) पाठपुरावा सुरु आहे.

दरम्यान, हरवलेल्या महिला- मुलींच्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून राज्यातील महिलांना सुरक्षिततेचा विश्वास देण्यासाठी संबंधित विभागांना तातडीने सुचना कराव्यात, असे सुचविणारे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितले.

दरम्यान, हरवलेल्या व्यक्तिंच्या विशेषतः मुलींच्या घटनांवर बोलताना रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, औरंगाबादेत ३९ दिवसात २८ तरुणी गायब झाल्या असल्याचे बातम्यांमधून वाचले. याची सु- मोटो दखल घेऊन राज्य महिला आयोगाने औरंगाबाद पोलिस आयुक्तांना (Police commissioner, Aurangabad) याचा तपास करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मोठ्या शहरात तरुणी गायब (missing of girls) होण्याचे प्रकार वाढत असून काही प्रकरणी तक्रार दाखल केल्यास पुढील पाठपुरावा होत नसल्याच्या कुटुंबियांच्या तक्रारी आहेत. तर काही प्रकरणात स्वमर्जीने सज्ञान मुली घर सोडतात, त्याचाही पाठपुरावा होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत.

मात्र, पोलिस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तिंचा तपास करण्यासाठी एक पोलिस अधिकारी आणि दोन अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर महिलांच्या संदर्भात गुन्ह्यात त्वरीत कारवाईसाठी विशेष युनिट काम करत असते. या यंत्रणांना विविध घटनांमध्ये एसओपी (SOP) करावी यासाठी राज्य महिला आयोगाने पाठपुरावा केला आहे.

तसेच जानेवारी २०२२ मध्ये हरवलेल्या व्यक्तिंचा विभाग पोलिस उपायुक्त यांच्यावतीने पत्र पाठवून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. तरीही हरवलेल्या व्यक्तिंची संख्या वाढत असल्याची खंत चाकणकर यांनी यावेळी व्यक्त केली. यात तरुणींची संख्या मोठी आहे. त्यामुळेच राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांना राज्यातील महिलांना सुरक्षितेचा विश्वास देण्यासाठी संबंधित विभागांना तातडीने सुचना कराव्यात, तसेच पाठपुरवा करावा, असे सुचविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here