Twitter : @maharashtracity

मुंबई

हे सरकार वेगाने आणि सर्वसामान्यांसाठी काम करणारे सरकार आहे. केंद्र सरकार आपल्यामागे आहे, मदत करणारे आहे मग आपण का मदत घेऊ नये? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जागतिक नेते म्हणून आज जग पाहते. ते आमचे पालक आहेत, एकही सुट्टी न घेता नऊ वर्षे काम करणारे ते नेते आहेत. त्यांचे नेतृत्व देशाला प्रगतीपथावर नेईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत व्यक्त केला. कोविड साथ काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. येथे महानायक छत्रपती शिवाजी महाराज हेच, औरंगजेब हा खलनायकच, असेही त्यांनी ठासून सांगितले.

विरोधी पक्षांनी आणलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देत होते. आम्ही गद्दार नाही, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेणारे आहोत. ज्यांनी आम्हाला पन्नास खोके म्हणून हिणवले, त्यांनी आमचे पन्नास कोटी रुपये देऊन टाका, अशी मागणी केली. ते देऊन टाकले, आम्हाला कोणाची प्रॉपर्टी नको. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

ते म्हणाले, मुख्यमंत्री मदत योजनेतून शंभर कोटी रुपये आतापर्यंत दिले. आधीच्या सरकारने अडिच वर्षात फक्त दोन कोटी रुपये दिले होते. आम्ही फेसबूक लाइव्ह आणि घरी बसून नाही तर ऍक्शन मोडवर काम करणारे आहोत. आम्ही दोष देणारे नाहीत तर ठोस काम करणारे आहोत. काहींना फक्त निवडणुकीत मुंबईकर आठवतो. मूळ मुंबईकरांना पुनर्वसनाचे प्रश्न सोडवून पुन्हा मुंबईत आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, हे सरकार पडेल, असे काही लोक बोलत होते, ते जितके बोलतील तितके हे सरकार मजबूत होत जाईल. आम्ही विकासाचे वारकरी आहोत, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.

राज्यात एका वर्षात एक लाख १८ हजार कोटींची गुंतवणूक आली. एक लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार झाले. गुंतवणूकीत महाराष्ट्र पुन्हा एक नंबरचे राज्य झाले, असेही ते यावेळी म्हणाले.

विरोधी पक्षनेते यांनी सादर केलेल्या पेनड्राईव संदर्भात चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणात आपल्या प्रश्नांना उत्तरे मिळाली नाहीत, यामुळे संतप्त विरोधी सदस्यांनी विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली सभात्याग केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here