Twitter: @maharashtracity
मुंबई: वरळी येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या धाराशिव येथील दयानंद काळे या विद्यार्थ्यांचा वसतीगृह परिसरातील झाडावरुन पडून आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. (Medical student dies in Poddar Ayurvedic College)
या दुर्घटनेनंतर पोद्दार रुग्णालयाच्या अपघात विभागात अपुऱ्या सुविधा व आयसीयू उपलब्ध नसल्याने दयानंदला नायर येथे नेण्यात आले. मात्र, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोद्दार महाविद्यालयात सुविधा मिळाव्यात यासाठी अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यातून आदेशही देण्यात आले. मात्र, कारवाही शून्य असल्याचे या दुर्घटनेतूनसमोर येत आहे.
या दुर्घटनेमुळे पोद्दार महाविद्यालयात असुविधा असल्याची बाब समोर येत आहे. या ठिकाणी आयसीयूसह (ICU) अद्ययावत सेवा सुरु करण्यात याव्यात यासाठी मागील काही वर्षे शासनस्तरावर सतत पाठपुरावा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय येथील असुविधांवर अधिवेशनातही वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले होते.
त्यातून पोद्दार रुग्णालयात आयसीयू सुरु करण्याबाबत शासन निर्णय झाला. त्यासाठी यंत्रणाही निर्माण केली, मात्र तत्कालीन मंत्र्याच्या आदेशामुळे हा आयसीयू विभाग सुरु होऊ शकला नाही. केवळ सरकारी अनास्थेमुळे पोद्दार रुग्णालयातील (Poddar Hospital) अपुऱ्या सुविधांमुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला व पारधी समाजातील गरीब कुटुंबातील एका मुलाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले असा आरोप सर्व स्तरातून होत आहे.
या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेचा निषेध म्हणून पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातील सर्व डॉक्टर्सनी ओपीडी सेवा बंद पाडत काम बंद आंदोलन (No work protest by doctors) सुरु केले. यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊन पोद्दारमधील रुग्णसेवेवर याचा परिणाम झाला.
या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच युवासेना (Yuva Sena) वरळी विधानसभा उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील व विभाग अधिकारी संकेत सावंत यांनी तातडीने पोद्दार रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी वैद्यकीय अधीक्षक, रुग्णालय प्रशासन, पोलीस व डॉक्टर विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली व सर्व डॉक्टर्सना आंदोलन मागे घेत पुन्हा रुग्णसेवा सुरु करण्याची विनंती केली.
या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन धीर दिला व पुढील सोपस्कार पार पडण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याबाबत आश्वस्त केले असल्याचे अभिजीत पाटील व संकेत सावंत यांनी सांगितले.